Pune: शहरात आणखी दोन ‘कोरोना पॉझिटीव्ह’ रुग्ण, एकूण संख्या 23! राज्यातील आकडा 64 वर!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात नव्याने आणखी दोन रुग्णांच्या कोरोना निदान चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 23 वर जाऊन पोहचली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 64 झाला आहे. 

नव्याने आढळलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकजण आयर्लंडला जाऊन आलेला आहे तर दुसरा रुग्ण हा देशाबाहेर कोठेही गेलेला नव्हता. भारती विद्यापीठात दाखल झालेल्या 43 वर्षीय महिलेची कोरोना निदान चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ही महिला परदेशात जाऊन आलेली नाही, तरी देखील तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरात आतापर्यंत एकूण 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 आहे.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या काल (शु्क्रवारी) 52 होती. त्यात एका दिवसांत तब्बल 11 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे घाबरून जायचे कारण नसले तरी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाने अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. मुंबईत 10 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

संबंधित आणखी बातम्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.