Pune : उलगडले ‘कानडा’ रागाचे वैविध्य

एमपीसी न्यूज – गायन – वादन आणि नृत्याला चित्रकलेची जोड (Pune ) देत अनेक भावछटांचे प्रकटीकरण करणारे ‘कानडा चे रंग’ शुक्रवारी रसिकांनी अनुभवले. भारतीय अभिजात संगीत परंपरेत नानाविध प्रकारांनी सादर होणाऱ्या ‘कानडा’ रागाचे विविध प्रकार यानिमित्ताने रसिकांसमोर आले आणि गायन-वादन-नृत्य-चित्र या कलांमधल्या अंतरंग संबंधांचे दर्शनही घडले.

प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आणि जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रात्रीच्या कानडा रागावर आधारित ‘संगीत संध्या’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मयूर कॉलनी येथील बालशिक्षण सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात सतारवादन, गायन, नृत्य, चित्रकला आणि मिडलेच्या माध्यमातून ‘कानडा’ रागाचे अनेक प्रकार रसिकांना अनुभवता आले.

जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनच्या रचना साबळे, सिमरन खियानी आणि ज्येष्ठ बासरीवादक आणि गुरू पं. केशव गिंडे यावेळी आवर्जून उपस्थित होते.

सुरवातीला जयपूर – सेनिया घराण्याची परंपरा सांगणाऱ्या सतार वादक पं. सप्तर्षी हाजरा यांनी राग नायकी कानडा सादर केला. मोजक्या वेळात रागाचे स्वरूप मांडून, त्यांनी वातावरणनिर्मिती साधली. त्यानंतर द्रुत तीन तालात शहाणा कानडामधील रचना सादर केली.

Chakan : कंटेनरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांनी काफी कानडा रागातील दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर अभोगी कानडा मधील डॉ. अश्विनी भिडे देशपांडे रचित ‘रस बरसत तोरे घर’ ही बंदिश तसेच द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगावर आधारित बंदिश ही सादर केली.

‘नृत्यवेध’ संस्थेच्या संचालक, गुरू मनीषा साठे यांच्या ज्येष्ठ शिष्या कथक नृत्यांगना डॉ. माधुरी आपटे यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिरचनेवर मराठमोळ्या परिवेशात नृत्य सादर केले. सानिया पाटणकर आणि त्यांच्या शिष्यसमुदायाने अडाणा कानडा रागातील ‘माता कालिका’ ही लोकप्रिय रचना पेश केली. सर्व कलाकारांनी एकत्रितरीत्या सादर केलेल्या वृंदगायनात ‘मिडले’मध्ये होरी, त्रिवट, नटवरी तराणा, थाटमाला, गजल आणि चित्रपटसंगीतातील गीतांची झलक समाविष्ट होती. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘झूम झूम बादरवा’ या सुहा कानडा रागातील बंदिशीने कार्यक्रमाची सांगता झाली.

चित्रकार वसुधा कुलकर्णी यांनी रंगरेषांच्या माध्यमातून हे कानडाचे वातावरण समर्पक चित्रांमधून रेखाटले. या कलाकारांना आशय कुलकर्णी (तबला), अनुराग जोशी (बासरी), अमेय बिच्चू (हार्मोनिअम), अमन वारखेडकर (की बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली. स्वाती प्रभूमिराशी यांनी सूत्रसंचालन (Pune ) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.