Pune : ‘मेट्रो’पेक्षा पुण्यात ‘वॉटर ट्रान्सपोर्ट’ महत्वाचा -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर; ‘मुख्यमंत्री’ होणार असल्याच्या दिल्या घोषणा

वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास देणार महत्वाच्या विषयांना प्राधान्य

एमपीसी न्यूज – पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट महत्वाचा आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. आकाशात मेट्रो बांधली, खालचे काय? पिलरमुळे रस्ता कमी झाला. टु-व्हीलर खालून जाणार, त्याचे काय? त्यामुळे आणखी ट्राफिक जाम होणार, यापेक्षा ‘वॉटर ट्रान्सपोर्ट’ कमी खर्चाचा होता. शहरातील नद्या ये – जा करण्यासाठी असतात. धरणांत चांगला पाणीसाठा होतो. शहराच्या हद्दीत पाणी कसे खेळवायचे?, कोणत्या वेळी सोडायचे?, थांबलेले पाणी ‘वॉटर-वे’साठी सोडायचे, याचे सर्व नियोजन आमच्याकडे आहे. आमची सत्ता आली तर, वॉटर ट्रान्सपोर्टला प्राधान्य देणार आहे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे.

विधानसभा निवडणुकीनिमित्त वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आज (बुधवारी, दि. 16) सायंकाळी आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी स्टेडियम मंगळावार पेठ जुना बाजार येथे ही सभा झाली.

शिवाजीनगरचे उमेदवार अनिल कुराळे, पुणे कॅन्टोन्मेंटचे लक्ष्मण आरडे, हडपसरचे घनश्यामबापू हाके, वडगावशेरीचे प्रवीण गायकवाड, खडकवासलाचे आप्पासाहेब आखाडे, कोथरूडचे अ‍ॅड. दीपक शामदिरे, पर्वतीचे हृषीकेश नांगरे पाटील, भोर – वेल्हा – मुळशीचे भाऊसाहेब मर्गळे यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली.

यावेळी शिवाजीमहाराज यांचे वंशज नामदेवराव जाधव, शहराध्यक्ष मूनवर कुरेशी, माजी शहराध्यक्ष अतुल बाहुले, भारीपच्या महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण उपस्थित होते. लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने 42 लाख मते घेतली होती. मुख्यमंत्री आम्ही विरोधी पक्ष होणार असल्याचे म्हणत आहे. पण, आम्ही सत्ताधारी होणार असून बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे सांगताच नागरिकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, 2014 – 2019 या 5 वर्षांत 2 लाख कंपन्या बंद पडल्या. 4 माणसाप्रमाणे 8 लाख माणसांचा रोजगार गेला. मग आता 1 कोटी रोजगार कसे देणार? आम्ही पोलिसांची ड्युटी 8 तास करण्याची मागणी करीत आहे. त्यामुळे 7 लाख पोलीस अजून भरती होतील. आम्ही जे शक्य आहे तेच सांगतो. भाजपसारख्या वलग्ना करीत नाही. यशवंतराव चव्हाण यांची नीती वापरून कारखानदारी उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पुण्यात केवळ एफयसआय वाढविणार असल्याचे सांगण्यात येते. पुण्याचा आकार हा कपबशी सारखा आहे. पुणे आणि मुंबईत फरक आहे. मुंबई ही आकाशातच वाढणार आहे, तसे पुण्याचे होणार नाही. पुण्याचा कचरा फुरसुंगी गावात जिरविण्यास विरोधात आहे. आमच्याकडे हा कचरा जिरविण्याचा प्लॅन रेडी असल्याचे आंबेडकर यांनी निक्षूण सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.