Pune : पुण्याचे सेलेब्रेटी रोड अन त्यावरील वाहतूक

एमपीसी न्यूज – पुणे (Pune) तिथे काय उणे, पुण्याचं म्हंटल, कि ते भारीच असतं. या काही पुणेरी म्हणीप्रमाणे पुण्याचे रस्ते देखील सेलेब्रेटी आहेत. तुम्ही म्हणाल ते कस बुवा…तर अहो या पुण्याच्या रोडची जोवर ब्रेकींग न्यूज होत नाही ना तोवर त्यावरच ट्रॅफिक तसूभरही हलत नसत…

आता तुम्हीच बघा ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकले अन सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे चौकातील पूल पाडण्यात आला. या गोष्टीला काही महिने उलटले नाही, तोवर नवले पुलावर ट्रक चालक भावड्याने टशनमध्ये 30-40 गाड्या उडवल्या. मग काय नवले पूल पण झाला ना सेलेब्रीटी. हा रस्ता किती चुकीचा अन गैरसोयीचा आहे, हे घसा फाडून नागरिक सांगत होते. पण, ऐकतं कोण?

मग झाला हा अपघाताचा धमाका! रोहीत शेट्टीच्या पिक्चरला शोभेल असा सीन. हा सीन पाहून प्रशानाला वाटलं, की नाही इथे काही तरी चुकतंय अन ते आपण सुधारले पाहिजे. वरातीमागून घोडे तसे प्रशासनाने अपघातानंतर अतिक्रमण हटावण्यास आजपासून (मंगळवार) सुरुवात केली आहे.

Talegaon Dabhade : ग्रामदैवत डोळसनाथ महाराजांच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा

एवढी मोठ्ठी घटना घडली, अन पुणेकर शांत बसतील असे होणारच नाही. चांदणी चौकाच्या मीम्सनंतर नवले पुलाच्या मीम्सचा देखील पाऊस पडलाय सोशल मीडियावर. सावधान पुढे नवले ब्रीज आहे, नवले ब्रीजवर जाताय..गाडीचा विमा काढलाय ना? साऊथच्या मुव्हीपेक्षा भारी Action सीन होतात, आमच्या नवले ब्रीजवर. त्या ट्रक चालकालाही वाटले नसेल, की आपली गाडी न्यूट्रलवर ठेऊन आपण एवढ्या लोकांना कामाला लावू शकतो.

अगदी मार्मीक असे जोक व मीम पाहून प्रशासन तर कामाला लागलंय खरे; पण ज्यांच लाखोंचे नुकसान झालंय, जे काही कारण नसताना जखमी होऊन दवाखान्यात उपचार घेत आहेत, त्याला जबाबदार कोण? असा सवाल मात्र नागरिक उपस्थित करत आहेत.

याविषयी बोलताना महामार्ग, त्यावरील समस्या (Pune) यासाठी काम करणारे पवनजीत माने एमपीसी न्यूजशी बोलताना म्हणाले की, ”ऍक्शनला रिऍक्शन अशी सवय प्रशासनाला झाली आहे. रस्ते हे एन्ड टू एन्ड प्लॅनने बनवणे गरजेचे असते. मात्र, आपल्या इथे तस होत नाही. नवले पुलावर केवळ अतिक्रमण हटवून चालणार नाही, तर हा पूल रुंदावणे गरजेचे आहे.”

महामार्गाच्या तीन लेनसाठी हा दोन लेनचा पूल आहे. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. अपघात किंवा अशी काही घटना घडली, तरच पोलीस तेथे येतात. चांदणी चौकाचा प्रश्न यांनी सोडवला, पण पुढे नागरिक नवले पूल, वाकड या भागात अडकतोच ना. प्रत्येक कोंडीला प्रशासन अशा घटनांची वाट बघू शकत नाही. महामार्गावर टोल भरून अशी गैरसोय नागरिकांना सहन करावी लागत आहे हे दुर्दैव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.