Pune : पुणेकरांनी अनुभवला 36 वर्षांतील ‘हॉटेस्ट डे’! पारा 42.6 अंशांवर!

उष्णतेची लाट आणखी तीन दिवस, पिंपरीत पारा 43 अंशांवर पोहचण्याची भीती

एमपीसी न्यूज – पुणेकरांनी आज गेल्या 36 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस अनुभवला. शहरात आज 42.6 अंश सेल्सियस इतक्या या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. गेल्या आठवड्यात कमान तापमान 40-41 अंशांच्या आसपास राहिले आहे. अजून तीन दिवस तरी उष्णतेची ही लाट कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या (शनिवारी) कमाल तापमान 43 अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज ‘गुगल वेदर’ने वर्तविला आहे. 

पुणे शहरात यापूर्वी 19 व्या शतकात सात मे 1889 आणि 30 एप्रिल 1897 या दोन दिवशी 43.3 अंश सेल्सियस या सर्वांत जास्त तापमानाची नोंद झाल्याचे वेधशाळेत उपलब्ध असलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. विसाव्या शतकात 29 एप्रिल 1983 ला सर्वाधिक म्हणजे 43.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर 36 वर्षांनी म्हणजे चालू एकविसाव्या शतकात आज 42.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. 1983 नंतर 18 मे 1984 ला 42.5 अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले होते. 19 व्या शतकात 28 मार्च 1892 ला 42.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.

तापमानाचा हा इतिहास पाहता आज दिवस हा शहराच्या इतिहासातील सर्वांत उष्ण दिवसांपैकी एक ठरला आहे.निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आकाशातील सूर्याच्या कोपालाही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात शहरातील तापमान रोज नवेनवे उच्चांक नोंदवत असताना नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले आहेत. दुपारी उन्हामुळे शरीराची प्रचंड काहिली होत आहे. उन्हाच्या कडाका असल्याने शहरातील रस्त्यांवरील दुपारची वर्दळही एकदम रोडावल्याचे पहायला मिळत आहे. घरात व कार्यालयांमध्ये पंखे लावूनही घामाच्या धारा वाहत असल्याने नागरिक हैराण झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like