Pimpri News: मुलांना साहित्य देण्याच्या नावाखाली शिक्षण समितीकडून जनतेच्या पैशांची लूट – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने जनतेच्या पैशांची लूट करून ठेकेदार हिताचे धोरण राबविले जात आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्यात आमचा विरोध नव्हता, नाही आणि नसेलही; मात्र मुलांना साहित्य देण्याच्या नावाखाली ठेकेदारांची घरे भरण्यास आणि जनतेच्या पैशांच्या होणा-या लुटीस तीव्र विरोध आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष शाळा सुरू होत असताना टॅब खरेदीबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात गटनेते कलाटे यांनी म्हटले आहे की,
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता पुढील महिन्यात शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. असे असताना आता टॅब खरेदी विषयी चर्चा सुरु आहे.

वास्तविकपणे 2019-20 यावर्षातच टॅब देणे गरजेचे होते. कोरोना काळात शाळा ऑनलाईन झाल्या. त्यावेळी या टॅबचा उपयोग झाला असता मात्र शाळा भरण्यास सुरुवात होणार आणि टॅब खरेदीचा घाट घातला जात आहे.

वास्तविक पटसंख्याबाबत विचारणा करूनही शिक्षण समितीकडून माहिती दिली जात नाही. तसेच महापालिका शाळेत शिकणारी मुले ही गरीब कुटुंब व प्रतिकूल परिस्थितीतून आलेली दिसतात. ऑनलाईन शिक्षणासाठी आपण त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा आहे कि नाही हे देखील शिक्षण समितीने मागील 2 वर्षात तपासले नाही.

महापालिका विद्यार्थ्यांना मदत करण्यात आमचा विरोध नव्हता नाही आणि नसेलही. मात्र मुलांना साहित्य देण्याच्या नावाखाली ठेकेदारांची घरे भरण्यास आणि जनतेच्या पैशांची होणारी लूट यास विरोध आहे. त्यामुळे टॅब खरेदी करताना शहर व विद्यार्थी हिताचा विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.