Raj Thackeray : “मला वाढदिवसाच्या दिवशी कोणालाच भेटता येणार नाही” – राज ठाकरे

एमपीसी न्यूज – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी प्रकृतीच्या कारणास्तव यंदा वाढदिवसाच्या दिवशी कोणीच त्यांना भेटण्यास येऊ नये असे आवाहन केले आहे. ठाकरे सध्या होम क्वारंटाईन आहेत, तर पुढच्या आठवड्यात त्यांच्यावर हीप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज ठाकरे यांनी वाढदिवस मनसैनिकांच्या अनुपस्थितीतच साजरा करण्याचे ठरविले असून याविषयी सोशल मिडीयावर व्हाईस क्लीप टाकून संदेश जारी केला आहे.

14 जून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांचा वाढदिवस. या दिवशी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, आशिर्वाद देण्यासाठी येतात आणि त्यांच्याकडून पक्षाचे काम आणखी जोरात करण्यासाठी उर्जा घेऊन जातात. परंतु या वर्षी मनसैनिकांना राज ठाकरे यांनी भेटता येणार नाही, त्यामुळे काहींची यामध्ये नाराजी होणार हे नक्की.

दरम्यान, याबाबत राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर व्हाईस नोट द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ठाकरे म्हणतात, “त्यादिवशी पुण्याला जी सभा झाली आपली, त्या पुण्याच्या सभेमध्ये मी आपणा सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. जेव्हा मी हाॅस्पिटलला अॅडमिट झालो त्यावेळी अॅडमिट झाल्यानंतर सगळ्या टेस्ट वगैरे झाल्या आणि रात्री मला डाॅक्टरांनी सांगितलं, की काहीतरी कोविडचा डेड सेल आहे. ते काय असतं हे मलाही नाही माहित आणि कोणालाच नाही माहित, असो…” असे म्हणून ठाकरे यांनी सध्याच्या त्यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल सांगितला.

Santosh Jadhav Arrested :सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण; शार्प शूटर संतोष जाधव पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुढे ठाकरे म्हणाले, “त्यामुळे माझी शस्त्रक्रिया रद्द झाली. आता साधारणपणे कोविडचे नियम पाळून दहा – बारा – पंधरा दिवस क्वारंटाईन म्हणजे घरी होतो, आहे आणि या सगळ्या दरम्यान 14 तारखेला माझा वाढदिवस आला आहे. आपण सर्वजण माझ्या वाढदिवसाला आपण प्रेमाने, उत्साहाने माझ्याकडे सर्वजण भेटायला येतात. मीही आपल्या सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यानंतर बरं सुद्धा वाटतं. पण या वर्षी 14 तारखेला वाढदिवसाला कोणाला म्हणजे कोणालाच भेटता येणार नाहीये. याचे कारण परत त्या गाठीभेटीमध्ये परत जर संसर्ग झाला आणि त्याच्यातून मला समजा परत शस्त्रक्रिया पुढे ढकलायला लागली, तर शेवटी किती पुढे ढकलायची याला सुद्धा काही मर्यादा असतात,” असे म्हणून एक मानसिक घालमेल असली तरीही सध्या काय महत्त्वाचे आहे हे ठाकरे यांनी आधोरेखित केले.

पुढच्या आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे आणि त्यामुळे मी कुठल्याही प्रकारचा कसलाही धोका पत्करू इच्छित नाही आणि म्हणून मी 14 तारखेला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे. आपण जिथे आहात, तिथेच राहा. माझी ज्यावेळी शस्त्रक्रिया पुर्ण होईल, जेव्हा बरं वाटू लागेल, त्यानंतर आपणा सगळ्यांना मी निश्चित भेटेन, पण 14 तारखेला आपण कृपया कोणीही घरी येऊ नये असे आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी मनसे कार्यकर्त्यांना यावेळी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.