Talegaon News : रक्षाबंधन विशेष! वृषाली आणि संकेत खळदे या बहीण-भावाच्या नात्याची अतूट कहाणी

एमपीसी न्यूज – बहीण-भावाचं नातं हे जगातील एक सुंदर आणि तितकच भावनिक नातं आहे. प्रत्येक घरात बहीण-भावाच्या प्रेमाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. जिव्हाळा, राग, ओरडा-ओरड, कधी कधी फायटिंग,  रुसवे- फुगवे आणि कधीच न सुकणारा प्रेमाचा ओलावा, असं हे राखीच्या धाग्यासारखं नाजूक आणि तितकचं सुंदर नातं आहे.

तळेगाव मधील वृषाली विक्रांत सैंदाणे (लग्नानंतर) आणि संकेत खळदे हे दोघे सख्खे चुलत बहीण-भाऊ आहेत. यांच्या घराला राजकीय आणि सामाजिक सेवेची मोठी पार्श्वभूमी आहे. या सगळ्या वातावरणात वाढलेल्या  या दोघांचं नाते सख्ख्या बहीण-भावापेक्षाही जवळचे आहे. एकत्र शाळेत जाण्यापासून ते लग्नानंतर एकमेकांची काळजी घेण्यापर्यंत, तसेच कायम असलेला प्रेमाचा ओलावा या सगळ्या आठवणींना बहीण-भावांनी रक्षाबंधननिमित्त उजाळा दिला.

‘संकेतला सगळ्यात अगोदर चारचाकी चालवायला शिकला होता, मला ती शिकायची होती पण, चारचाकी चालवायला परवानगी मिळत नव्हती. मग आम्ही रात्रीच्या वेळी गुपचूप चारचाकी  घेऊन बाहेर जायचो आणि माझी गाडी शिकण्याची हौस पूर्ण व्हायची.’ संकेत माझा लहान भाऊ आहे. पण, तो मोठ्या भावासारखा सतत आमच्यासोबत उभा राहिला. आमचं एकत्र कुटुंब असल्याने, एकत्र जेवण करण्यापासून ते शाळेत जाणं, अभ्यास, खेळ आणि बहिण-भावांची गोड भांडणं सगळं एकत्रच व्हायचे. एकमेकांची समजूत काढण्यासाठी एका कॅडबरीवर सगळं विसरून जायला आम्ही तयार असायचो. रक्षाबंधन आणि भाऊबीजेची आम्ही खास आतुरतेनं वाट बघायचो. गिफ्ट, पैसे याच्या आतुरतेपेक्षा या सणांनी बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट केलं आहे. पण, दर रक्षाबंधनला कॅडबरीचा मिळणारा बॉक्स इतर कुठल्याही गिफ्टपेक्षा किमती आणि स्पेशल वाटतो.’

‘संकेत कमालीचा जिज्ञासू आहे, त्याला वेगवेगळे विषय समजून घेण्यात रस आहे. समाजकार्य़ात तो नेहमीच सक्रीय सहभाग घेतो. आमच्या घराला राजकीय आणि सामाजिक सेवेची मोठी पार्श्वभूमी आहे. आमचे आजोबा काकासाहेब खळदे हे तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. माझे वडिल यादवेंद्र खळदे हे देखील  मा़जी नगरसेवक आहेत. तसेच, राजेंद्र खळदे हे माजी सभापती होते. कै. मुकुंद आण्णा खळदे हे इंद्रायणी कॉलेजवर उपाध्यक्ष होते. तसेच, संकेतचे वडील सतीश खळदे समाजकार्यात सक्रिय होते.’

‘आमच्या घरात राजकारणाकडे सामाजिक सेवेची संधी म्हणून पाहिले जाते. संकेतला देखील सामाजिक सेवेची आवड आहे. तो विकासाच्या मुद्यावर तासनतास बोलू शकतो. सामाजिक स्तरावर काम करत असताना विकासाचा दृष्टीकोन महत्वाचा असतो तो त्याच्याकडे आहे. शांतपणे विषय समजून घेऊन आपली प्रतिक्रिया देणं, हा त्याचा गुण मला नेहमीच विशेष वाटत आला आहे,’ असं वृषाली खळदे म्हणाल्या.

‘एका बहिणीची काय इच्छा असते की, आपला भाऊ खूप मोठा व्हावा, त्याने प्रगतीची नवी शिखरे गाठावीत. माझी देखील हीच इच्छा आहे की, त्याला सामाजिक सेवेची आवड आहे ती त्याने जोपासावी, लोकांची मदत करावी. सुख दु:खाच्या क्षणात आम्ही नेहमीच एकत्र राहणार असून, दरवर्षीच्या रक्षाबंधनला त्याला प्रगतीच्या वेगळ्या उंचीवर त्याला पाहायचं आहे,’ अशी इच्छा वृषाली खळदे यांनी व्यक्त केली.

संकेत खळदे यांनी आपली बहिण वृषाली हिच्या बद्दल आठवणींना उजाळा देताना म्हणाले, ‘आमचे 40  ते 50 लोकांचे एकत्र कुटुंब आहे. वृषाली आणि मी एकत्र खेळलो बागडलो, एकत्र मोठं होत असताना अनेक सुख दु:खाचे प्रसंग पाहिले. या सगळ्यातून आमचं नातं आणखीच घट्ट होत गेलं. आमच्यातील प्रेमाचा ओलावा वाढतच गेला. रक्षाबंधन- भाऊबीज हे सण आमच्यासाठी नेहमीच खास राहिले आहे, आमच्या एवढ्या मोठ्या घरात हा सण एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होतो. वृषाली मोठी बहीण आसल्याने आमची काळजी करणारी प्रेमळ बहीण म्हणून माझ्या सोबत राहिली आहे, आणि यापुढे देखील राहील यात शंका नाही.’ असे संकेत खळदे म्हणाले.

‘संपत्ती कुणीही कमावते पण, माणसं ठराविक लोकंच कमवतात, हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे. अशी शिकवण माझे वडील कै. सतीश खळदे यांनी आम्हाला दिली आहे आणि तोच वारसा आम्हाला जपायचा आहे,’ असं संकेत खळदे यांनी यावेळी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.