Talegaon News : कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – किशोर आवारे

 एमपीसी न्यूज – ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे काल (गुरुवारी) रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व कोणत्याही चौकशी सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ राजकीय हेतूने आपल्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.आपल्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचे आपल्याला माध्यमांच्या प्रतिनिधींकडून समजले.तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला. फिर्यादीत गुन्हा घडल्याचा दिवस आणि वेळ दिला आहे. त्यावेळी आपण तळेगावमध्येच नव्हतो. त्याबाबतची खातरजमा पोलीस करून घेऊ शकतात. या संदर्भातील चौकशीसाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची आपली भूमिका राहील, असे आवारे यांनी सांगितले.

खोटे- नाटे गुन्हे दाखल करून त्यात विनाकारण आपल्याला गोवले जाणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

या संदर्भातील आरोपांची प्राथमिक चौकशी वरिष्ठ पोलिस अधिकारी करतील. त्यांना प्रथमदर्शनी आरोपात तथ्य आढळले तरच पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे तळेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.