Pimpri news: वैद्यकीय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप

डॉ. लक्ष्मण गोफणे वैद्यकीय विभागप्रमुख

एमपीसी न्यूज – कोरोना विषयक कामकाज शीघ्र गतीने होणे, कामकाजात अधिकाधिक पारदर्शकपणा येण्यासाठी  आयुक्त राजेश पाटील यांनी  वैद्यकीय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप केले आहे.  अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना दणका देत त्यांच्याकडील महत्वाचे कामकाज काढून घेतले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे वैद्यकीय विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली. तर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आरोग्य विभागासह कोरोना वॉर रूमची जबाबदारी दिली आहे.

शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव घेता महापालिका विविध उपाययोजना करत आहे. कोरोना विषयक कामकाज शीघ्र गतीने होण्याच्या दृष्टीने, या कामकाजात अधिकाधिक पारदर्शकपणा येणे, नागरिकांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळण्याच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कामाचे फेरवाटप करण्यात आले आहे.

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडील महत्वाचे कामकाज काढून घेतले आहे. त्यांच्याकडे महापालिकेची सर्व कोविड केअर सेंटर, ऑटो क्लस्टर, जम्बो हॉस्पिटल यांच्यावरील पर्यवेक्षनाचे कामकाज, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कात राहून सर्व पत्रव्यवहार आणि कोविड विषयक कामकाजाबाबत समन्वय ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.  आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे आरोग्य विभागाचे कामकाज कामय ठेवून कोरोना वॉर रूमचे संपूर्ण कामकाजात समन्वय ठेवणे. कोविड विषयक सोपविलेले आणि यापुढे सोपविण्यात येणारे कामकाज त्यांना करावे लागणार आहे.

 तर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे वैद्यकीय विभागामार्फत (वैद्यकीय मुख्य कार्यालय, मध्यवर्ती औषध भांडार व मध्यवर्ती साहित्य भांडार या विभागासह) करण्यात येणारे सर्व निविदा विषयक कामकाज, सर्व प्रकारची बिले अदायगीचे कामकाज, हॉस्पिटल रजिस्ट्रेशन विषयक संपूर्ण कामकाज, तसेच वैद्यकीय विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व रुग्णालये, दवाखाने (वायसीएमएच वगळून) यांचे संपूर्ण आस्थापना विषयक व प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज आणि वैद्यकीय विभागासाठी मानधनावरील मनुष्यबळ उपलब्ध करून देणे विषयक संपूर्ण कामकाज दिले आहे. वैद्यकीय अधिकारी वर्षा डांगे यांच्याकडे शहरातील कोविड विषयक सर्व लसीकरण केंद्रे, कोरोना तपासणी या विषयाचे प्रमुख म्हणून संपूर्ण कामकाज आणि कोविड विषयक अहवाल शासनास वेळोवेळी पाठविण्याची जबाबदारी असणार आहे.

 डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी वैद्यकीय विभागाचे विभागप्रमुख म्हणून कामकाज करावे. डॉ. पवन साळवे आणि डॉ. अनिल रॉय यांना सोपविण्यात आलेल्या कामकाजासाठी कोणतेही वित्तीय अधिकार नसणार आहेत. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामकाजाचा अहवाल अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना वेळोवेळी सादर करावा लागणार आहे. तसे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.