Chakan Crime News : ‘सामना’च्या पत्रकाराने शिवसेनेच्या नगरसेवकाकडे मागितली लाखोंची खंडणी

एमपीसी न्यूज – सामना वृत्तपत्रासाठी काम करणाऱ्या एका पत्रकाराने शिवसेना नगरसेवकाकडे लाखोंची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला. नगरसेवकाच्या विरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्याची धमकी देत नऊ जणांनी मिळून लाखोंची खंडणी मागितली, शिवाय एका महिलेच्या कॅन्सर सर्जरीचा खर्च करण्याचीही मागणी केली. खंडणीची मागणी करण्याऱ्यांमध्ये सामनाच्या पत्रकाराचाही समावेश आहे. ही घटना 4 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या कालावधीत चाकण येथे घडली.

प्रीतम शंकरसिंग परदेशी, संगीता वानखेडे, कांतीलाल सावता शिंदे, गीतांजली भस्मे, कल्पेश अनंतराव भोई (वय 49, रा. चाकण), संगीता नाईकरे, मंदा जोगदंड, प्रणित (पूर्ण नाव माहीत नाही), कुणाल राऊत अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नगरसेवक किशोर ज्ञानोबा शेवकरी (वय 41, रा. सावतामाळी चौक, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सक्रिय टोळी बनवून फिर्यादी यांना समाजात बदनाम करण्याच्या उद्देशाने एका महिलेला फिर्यादी यांच्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यासाठी वारंवार चाकण पोलीस ठाण्यात पाठवले. हे प्रकरण मिटविण्यासाठी नगरसेवक शेवकरी यांच्याकडे आरोपींनी सुरुवातीला 15 लाख रुपये त्यानंतर तडजोड करून 12 लाख रुपये खंडणी मागितली. दरम्यान, आणखी तडजोड करून आरोपींनी पाच लाख रुपये आणि विनयभंगाची तक्रार देण्यासाठी पाठवलेल्या महिलेच्या कॅन्सरच्या सर्जरीसाठी खर्च करण्याची मागणी केली.

आरोपींनी नगरसेवक शेवकरी यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागितले. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलवर झालेले चॅटिंग आणि रेकॉर्डिंग देखील उपलब्ध असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. फिर्यादी हे शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहेत, तर आरोपी कल्पेश भोई हा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रासाठी काम करत असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.