Sangvi Crime News : रावण गँगकडून हल्ला झाल्यास प्रतिउत्तर देण्यासाठी तडीपार गुंडाने आणली दोन पिस्तूल

एमपीसी न्यूज – सहा महिन्यांपूर्वी रावण गँगकडून कोरबू गँगच्या सदस्यावर गोळीबार झाला होता. तसाच हल्ला आपल्यावर झाल्यास जशास तसे उत्तर देण्यासाठी कोरबू गँगच्या सदस्याने दोन पिस्तूल जवळ बाळगल्या. पोलिसांना याची कुणकूण लागताच पोलिसांनी त्या तडीपार गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन पिस्तूल व पाच काडतूसे हस्तगत केली. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सांगवी परिसरात ही कारवाई केली.

मोहम्मद उर्फ मम्या मेहबूब कोरबू (वय 23, रा. उर्वेला हाऊसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी) असे अटक केलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी रावण गँगच्या गुंडांनी आकाश दोडमणी या तरुणावर गोळीबार केला. त्याच्या पायावर गोळी लागली होती. दोडमणी हा कोरबू गँगचा सदस्य आहे. आपल्यावरही गोळीबार होऊ शकतो, या भीतीने मोहम्मद कोरबू यानेही आपल्याजवळ पिस्तूल बाळगले होते.

खंडणी विरोधी पथक सांगवी परिसरात गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी संदीप पाटील, शैलेश मगर व सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील तडीपार गुंड मोहम्मद कोरबू हा औंध ऊरो रुग्नालयाच्या मागील बाजुस थांबलेला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे एक पिस्तूल आणि तीन काडतूस आढळून आले. पोलीस कोठडी दरम्यान त्याच्याकडून आणखी एक पिस्तूल आणि दोन काडतूसे असे एकूण 80 हजारांचे दोन पिस्तूल आणि एक हजार रुपयांची पाच जिवंत काडतूसे हस्तगत केली.

मोहम्मद कोरबू याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारमारी असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्याला 31 ऑक्‍टोबर 2020 रोजी पासून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, कर्मचारी संदीप पाटील, सुधीर डोळस, शैलेश मगर, अशोक दुधवणे, सुनिल कानगुडे, निशांत काळे, किरण काटकर, प्रदीप गोडांबे, विजय नलगे, अशोक गारगोटे व प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.