Sangvi : पोटगी द्यावी लागू नये म्हणून पतीकडून पत्नीची ‘अनोखी’ फसवणूक

एमपीसी न्यूज – घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरण सुरू असताना पत्नीच्या उत्पन्नाची माहिती न्यायालयात सादर करण्यासाठी पतीने पत्नीच्या इन्कम टॅक्स फॉर्मवरील ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक बदलला. त्याआधारे पत्नीच्या उत्पन्नाविषयी माहिती मिळवली. याबाबत पत्नीने पोलिसात धाव घेत पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.

याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मेलआयडी आणि मोबाईल क्रमांकधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांपूर्वी फिर्यादी महिलेचा आरोपी पतीशी विवाह झाला. दोघेही पती-पत्नी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकरी करतात. सुरुवातीला काही दिवस सुखाचा संसार झाला. पण, कालांतराने किरकोळ कारणांवरून दोघांमध्ये कुरबुर सुरू झाली. याचे मोठ्या वादात रूपांतर होऊ लागले. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयात प्रकरण सुरू असताना पत्नीने पोटगीचा दावा केला.

पत्नी माहिती तंत्रज्ञान कंपनीत काम करते. तिला मोठ्या पगाराची नोकरी आहे. त्यामुळे तिला पोटगीची गरज नसल्याचे पतीने न्यायालयाला सांगितले. तसेच पत्नीच्या उत्पन्नाची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यासाठी पतीने पत्नीच्या इन्कम टॅक्स फॉर्ममधील ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक बदलला. कालांतराने पत्नीने तिचा इन्कम टॅक्स भरला. त्याचे टीडीएस सर्टिफिकेट पतीने ऑनलाइन काढून घेतले.

पत्नीचे उत्पन्न, तिचा ई- मेल आयडी व फोन क्रमांक व्यक्तिगत बाब असल्याने त्यात ढवळाढवळ करून फसवणूक केल्याबाबत पत्नीने पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे धाव घेतली. सायबर सेलने प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी सांगवी पोलिसांकडे प्रकरण दिले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.