SNBP 28th All-India University Hockey Tournament : एसएनबीपी 28वी नेहरु अखिल भारतीय विद्यापीठ हॉकी स्पर्धा; सावित्रीबाई फुले पुणे आणि पंजाबी विद्यापीठ बाद फेरीत

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पंजाबी विद्यापीठ पटियाला संघांनी चुरशीचे विजय मिळवून येथे सुरू असलेल्या एसएनबीपी 28व्या नेहरु अखिल भारतीय विद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.

पिंपरीत नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने एकतर्फी लढतीत बनारस हिंदु विद्यापीठ संघाचा 10-0 असा पराभव केला. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिलेल्या पंजाबी विद्यापीठ संघाला मात्र एसआरएम विद्यापीठ संघाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला. त्यांनी 4-3 असा निसटता विजय मिळविला.

पंजाबी विद्यापीठाचे 2 सामन्यात 6 गुण झाले असून, पुणे विद्यापीठाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. त्यांनी सी गटातून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी या गटातून एसआरएम विद्यापीठ (3 गुण), बनारस हिंदु विद्यापीठ संघ (शून्य गुण) यांचे आव्हान गटातच संपुष्टात आले. भारतीय विद्यापीठ संघटना आणि हॉकी इंडिया यांच्या सहकार्याने ही स्पर्धा सुरू असून, एसएनबीपी संस्था समूह या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.

स्पर्धेच्या बाद फेरी प्रवेशासाठी पुणे विद्यापीठ संघाला विजय आवश्यक होता. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या तालेब शाह याने पाच गोल नोंदवून विजयात महत्वाचा वाटा उचलला. कर्णधाराला साजेसा खेळ करताना त्याने 17, 26, 35, 42 आणि 49व्या मिनिटाला गोल केले. त्याला प्रज्वल मोहरकर याने तीन गोल करून सुरेख साथ केली. त्यांच्या खेळाने पूर्व विभागातून चौथ्या स्थानाने या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या बनारस विद्यापीठ संघाला निष्प्रभ केले. गुरफान शेख आणि करण दुर्गा यांनी अनुक्रमे 54 आणि 56व्या मिनिटाला गोल करून संघाचा मोठा विजय साकार केला.

सी गटातील अन्य एका सामन्यात पंजाबी विद्यापीठ संघाने कमालीच्या संयमाने खेळ करताना मुसंडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसआरएम संघाचे सामन्यात परतण्याचे सारे दरवाजे बंद केले. मायकेल टोपनोने 13व्या आणि हरमीतने 35व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेले होते. मात्र, दोन्ही वेळा त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले. प्रथम 20व्या मिनिटाला जीवा कुमार आणि नंतर 39व्या मिनिटाला एम. हरिहरन याने गोल करून एसआरएम संघाला बरोबरी साधून दिली. पुढच्याच मिनिटाला बी. अमित याने गोल करून संघाला आघाडीवर नेले. मात्र दोन मिनिटांत दोन गोल करून पंजाबी विद्यापीठाने बाजी मारली. प्रतिआक्रमण करताना महकदीप सिंगने 48व्या मिनिटाला मिळालेला कॉर्नर सत्कारणी लावला. त्यानंतर 50व्या मिनिटालसा सुरज कुमारने मैदानी गोल केला.

ड गटात अजूनही बाद फेरी पात्रतेचे चित्र स्पष्ट नाही. गतविजेते एमजी काशी विद्यापीठ आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ यांच्यातील सामना 3-3 असा बरोबरीत सुटला, तर बंगळूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठावर 2-1 असा विजय मिळविला.

अत्यंत चुरशीच्या सामन्यात लव्हली विद्यापीठ संघाला बॉबी धमी सिंग याने 19व्या मिनिटाला आघाडीवर नेले. त्यानंतर चारच मिनिटाला अमित कुमार यादव याने काशी विद्यापीठाचे खाते उघडले आणि त्यानंतर विष्णू कांत सिंग याने 30व्या मिनिटाला संघाला आघाडीवर नेले. सामन्याच्या उत्तरार्धात लव्हली विद्यापीठ संघाला आकाशदीपने 42व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली आणि 51व्या मिनिटाला भूषण शर्माने आघाडीवर नेले. मात्र, सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना काशी विद्यापाठीला संधी चालून आली. त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि धनंजय मैतेईने 55व्या मिनिटाला ही संधी साधून सामना बरोबरीत राहिल याची काळजी घेतली.

याच ड गटातील दुसऱ्या सामन्यात बंगळूर विद्यापीठ संघाने दोन पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत मुंबईचे आव्हान परतवून लावले. पूर्वार्धात 30व्या आणि उत्तरार्धात 42व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरचे महंमद फहाद याने गोलात रुपांतर केले. मुंबईसाठी एकमात्र गोल 47व्या मिनिटाला भिम बहादूर बाटला याने केला.

ड गटातून आता लव्हली विद्यापीठाचे 2 सामन्यातून 4 गुण झाले असून, काशी विद्यापीठाचे तेवढेच गुण असले, तरी त्यांचे तीन सामने झाले आहेत. बंगळूर विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ संघाचे प्रत्येकी दोन सामन्यातून तीन गुण झाले आहेत.

निकाल –

सी गट – सावित्राबाई फुले विद्यापीठ पुणे 10 (प्रज्वल मोहरकर 7, 29 आणि 31वे मिनिट, तालेब शाह 17, 26, 35, 42 आणि 49वे मिनिट, गुरपान शेख 54वे, करण दुर्गा 56वे मिनिट) वि.वि. बनारस हिंदु विद्यापीठ, वाराणसी 0 (मध्यंतर 4-0)

पंजाबी विद्यापीठ, पतियाळा 4 (मायकेल टोपनो 13वे, हरमीत सिंग 35नवे, महकदीप सिंग 48वे, सुरज कुमार 50वे मिनिट) वि.वि. एसआरएम विद्यापीठ चेन्नई 3 (जीवा कुमार 20वे, एम. हरिहरन 39वे, बी. अमित 40वे मिनिट) (मध्यंतर 1-1)

ड गट – महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी 3 (अमित कुमार यादव 23वे, विष्णु कांत सिंग 30वे, धनजंय मैतेई 55नवे मिनिट) बरोबरी वि. लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा 3 (बॉबी धमी सिंग 19वे, आकाशदीप सिंग 42वे, भूषण शर्मा 51वे मिनिट) (मध्यंतर 2-1)

बंगळूर विद्यापीठ, बंगळूर 2 (महंमगद फहाद 30 आणि 42वे मिनिट) वि.वि. मुंबई विद्यापीठ 1 (भिम बहादूर बाटला 47वे मिनिट)

बाद फेरीसाठी पात्र संघ –
– अ गट – गुरुनानक देव विद्यापीठ, अमृतसर 7 गुण, व्हीबीएसपी विद्यापीठ जौनपूर 6 गुण
– ब गट – बंगळूर सिटी विद्यापीठ, बंगळूर 6 गुण
– सी गट – पंजाबी विद्यापीठ, पतियाळा 6 गुण, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे 6 गुण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.