Pimpri : कलम ३५३ मध्ये संशोधन करून सुधारणा करणे आवश्यक – अॅड असीम सरोदे

एमपीसी न्यूज – अपना वतन संघटनेच्या वतीने ३५३ कलमाच्या गैरवापराबाबत जनजागृती करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज रविवार दि. ९ जूनला सरकारी अधिकाऱ्यांकडून कलम ३५३ च्या गैरवापराच्या वाढत्या प्रमाणामुळे कार्यकर्त्यांची होणारी मुस्कटदाबी या विषयावर, वाकडमधील महाबुद्ध विहारमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड असीम सरोदे, प्रमुख उपस्थिती डॉ. अभिजीत मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मानव कांबळे होते. या परिसंवादास ६८ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पहिल्या सत्रात अॅड असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केले व दुसऱ्या सत्रात प्रश्नोत्तरे घेण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना अॅड असीम सरोदे म्हणाले की, सध्याच्या काही कायद्यांमध्ये  ब्रिटिशकालीन कायदयाचा अंतर्भाव होतो. त्यापैकी ३५३ कलम हे एक होय. यामध्ये सरकारी अधिकारी हे जनतेच्या कामासाठी असतात त्यामुळे त्यांनी जनतेची कामे सदभावनेने करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनी सुद्धा आपली वागणूक सुद्धा बदलली पाहिजे. कलम ३५३ च्या बाबतीत वाढणारे गुन्हे व तक्रारी पाहता यामध्ये संशोधनाची गरज आहे. त्यासाठी रस्त्यावरची लढाई तर लढवीच लागेल शिवाय दोन्ही सभागृहात याविषयी बोलले गेले पाहिजे व योग्य त्या सुधारणा केल्या पाहिजेत.

डॉ. अभिजित मोरे यांनी केवळ ३५३च नाही तर संपूर्ण चुकीच्या गोष्टींविरोधात नागरिकांनी आपापली जबाबदारी  ओळखून आपले कर्तव्य पार पडले पाहिजेत असे सूचित केले.

यावेळी अपना वतनचे अध्यक्ष यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितले की, ३५३ च्या गैरवापरामुळे सामाजिक कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय होत असल्याने याविरोधात जनजागृती, प्रबोधन व आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र लढा उभा केला पाहिजे. तसेच येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यावेळी अनेक लोकांनी ३५३ बाबत आपले अनुभव व्यक्त केले.

यावेळी डॉ. अमोल पवार, नितीन यादव, प्रताप गुजर, उमेश सणस, काशिनाथ नखाते, हनुमंत पिसाळ, संतोष लिम्कार, मयुर जयस्वाल, शहाबुद्दीन शेख, सुभाष साळुंके, सचिन वाघमारे, गुलाब पानपाटील, नाना भिंगारे यांच्यासह अनेक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, फातिमा अन्सारी, निर्मला डांगे, अपना वतन युवक आघाडीचे फारुकभाई शेख, हमीद शेख, तौफिक्र पठाण, विशाल निर्मल जितेंद्र जुनेजा आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.