Pune : कोरोनाला रोखण्यासाठी स्वयं शिस्त पाळणे आवश्यक – नवल किशोर राम

Self-discipline is essential to prevent corona - Naval Kishor Ram

एमपीसी न्यूज –  वाघोली परिसरात वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता नागरिकांनी स्वयं शिस्त‌ पाळणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केले आहे. 

पुणे जिल्हयातील वाघोली परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगल्या प्रकारचे काम करीत आहेत.

याबरोबरच नागरिकांनीही याबाबत स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे, प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या नियमांचे पालन करीत खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाच्या संकटावर निश्चितपणे मात करु तसेच आगामी काळात यादृष्टीने खबरदारी घेतल्यास व आपले वाघोली गाव व परिसर लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज व्यक्त केला.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज वाघोली ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेसोबतच ग्रामस्थांशी चर्चा केली.

यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे पाटील, हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सरपंच वसुंधरा उबाळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य व निवडक ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम यांनी वाघोली व परिसरातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये एकूण रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण, गावातील कोणत्या भागात रुग्ण वाढीचे प्रमाण वाढत आहे व त्याची कारणे काय आहेत या बाबत माहिती जाणून घेतली.

तसेच बाहेरील जिल्हयातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करण्यासंदर्भांतील सुरु असलेली कार्यवाही, जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, मास्क व सॅनीटायझरचा वापर तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.