Pune News : उतारवयात जीवनसाथी शोधण्याच्या नादात ज्येष्ठ नागरिकाने गमावले 16 लाख रुपये

एमपीसी न्यूज : उतारवयात पार्टनर सोबत असावा म्हणून जीवनसाथी डॉट कॉम या संकेत स्थळावर नाव नोंदणी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले. या जेष्ठ व्यक्तीला लग्नाचे स्थळ दाखवण्याच्या आमिषाने सोळा लाख रुपयांनी फसवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे अशाप्रकारे गेल्यामुळे त्या नागरिकावर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 63 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वीज महामंडळातून निवृत्त झाले आहेत. पत्नी आणि मुलांसोबत पटत नसल्यामुळे मागील काही वर्षापासून ते वेगळे राहतात. उतारवयात जोडीदार सोबत असावा म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वीच जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर लग्न करण्यासाठी नोंदणी केली होती. दरम्यान यानंतर फिर्यादी यांच्याशी लव इन या संकेतस्थळावरुन अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. तसेच नाव नोंदणी करण्यासाठी त्यांना 920 रुपये भरण्यास सांगितले.

लग्न होईल या या आशेने फिर्यादी व्यक्तीनेही पैसे भरले. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल द्वारे त्यांच्याशी संपर्क साधत स्थळ दाखवण्याचे आमिश त्यांना दाखवले आणि वेगवेगळ्या बँक खात्यात 16 लाख 32 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. इतके पैसे घेतल्यानंतरही फिर्यादीना कुठलेही स्थळ दाखवले नाही. दरम्यान या नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.