Shapith Gandharva – शापित गंधर्व – लेख 20 – भजनसम्राट अनुप जलोटा

एमपीसी न्यूज : त्यांनी संगीताचे संपूर्ण शिक्षण घेतले होते. त्यांचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास होता आणि त्यावर त्यांचे जबरदस्त प्रभुत्वही होते. (Shapith Gandharva) त्यांचे वडील पंडित पुरुषोत्तमदासजी जलोटा हेच त्यांचे गुरू होते. त्यांनी गायलेली कृष्ण भजने देशातच नव्हे, तर विदेशातही प्रचंड लोकप्रिय ठरली. मात्र का कुणास ठाऊक त्यांना चित्रपटसृष्टीत कधीही पार्श्वगायक म्हणून स्वतःला प्रस्थापित करता आलेच नाही. होय. ‘ऐसी लागी लगन, मैं नहीं माखन खायो, वो काला एक बाँसुरीवाला, जग में सुंदर हैं दो नाम….’ अशी एकाहून एक अवीट भजने ही ज्यांची ठाम ओळख आहे, ते शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, सुप्रसिद्ध भजनसम्राट ‘अनूप जलोटा’ यांना त्यांच्या अल्बमद्वारे मिळालेले यश चित्रपटसृष्टीत का मिळाले नाही, या यक्ष प्रश्नाचे उत्तर कधीही कोणालाही मिळालेले नाही.

उत्तराखंड येथील नैनिताल येथे 29 जुलै 1953 रोजी जन्माला आलेल्या अनूपजी यांचे वडील पुरुषोत्तमदास जलोटा हे स्वतः एक उत्तम शास्त्रीय गायक होते आणि ते कृष्णभजनेही उत्तम गात असत. साहजिकच अनूपजी यांनाही संगीताचे आणि गायनाचे बाळकडू घरातच मिळाले. त्यानंतर त्यांनी लखनऊ येथील भातखंडे संगीत विद्यालयात पुढील शिक्षण घेतले.

तुम्हाला खोटे वाटेल; पण त्यांनी ‘समूह गायक’ म्हणून आकाशवाणीवरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी ते गिटार, संतूर, तबला, ढोलकी, सरोद, सारंगी, इत्यादि वाद्येही वाजवत असत. आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ते आपल्या पहिल्या ऑडिशनमध्ये नापासही झाले होते.

त्यांनी महान गायक किशोरकुमार यांच्यासोबत त्यांच्या दौऱ्यात सहगायक म्हणून गाण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांना ‘ज्युनियर किशोरकुमार’ म्हणून संबोधले जाऊ लागले होते. (Shapith Gandharva) मात्र नंतर त्यांनी असा इतिहास घडवला की ते फक्त गायक म्हणूनच नव्हे तर ‘भजनसम्राट’ म्हणून सर्वदूर परिचित झाले. त्यांनी गायलेल्या कृष्णभजनांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता, पैसा आणि सोबतच स्थैर्यही मिळवून दिले. शासन दरबारी त्यांच्या कारकिर्दीची दखल घेत त्यांना अतिशय प्रतिष्ठेच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

Today’s Horoscope 05 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मात्र त्यांना या प्रतिमेचा फटका असा बसला की त्यांची फक्त भजनगायक म्हणूनच दखल घेतली जाऊ लागली. त्यांनी गैरफिल्मी गाणी आणि काही गझल्सही गायल्या; पण जे यश त्यांना भजनाने मिळवून दिले, तसे यश त्यांना चित्रपट पार्श्वगायक म्हणून मात्र मिळालेच नाही. त्यांनी स्वतःही एक चित्रपट निर्माण केला. मात्र त्यानेही फारसा फायदा झाला नाही. उत्तम भजने गाणारा, शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असणारा हा सूरसम्राट चांगला अन् यशस्वी पार्श्वगायक का होऊ शकला नाही, हे कोडे अनाकलनीय आहे.

अनेक भजने गाणाऱ्या अनूपजींनी देश-विदेशात असंख्य शो केले आहेत. त्यातूनच त्यांनी आपल्या आयुष्यात सुख, संपत्ती, स्थैर्य आणले आहे.असे जरी असले, तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य मोठेच वादग्रस्त राहिले आहे. त्यांनी एक- दोन नाही, तर तब्बल तीन वेळा लग्न केले आणि चौथ्या वेळी ते आपल्याहून कितीतरी लहान असलेल्या एका सुंदरीसोबत लिव्ह इनमध्ये आहेत. त्यांचा पहिला विवाह सोनाली सेठ यांच्यासोबत झाला होता; (Shapith Gandharva) मात्र हा विवाह फार काळ टिकला नाही. (सोनाली यांनी नंतर गज़लगायक रूपकुमार राठोड यांच्याशी विवाह केला.) त्यानंतर त्यांनी बिना बाठिया यांच्यासोबत विवाह केला. तिलाही त्यांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर लगेचच घटस्फोट दिला. त्यानंतर त्यांनी 1994 साली माजी पंतप्रधान स्व. इंद्रकुमार गुजराल यांची कन्या मेधासोबत विवाह केला. तिच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. त्याचे नाव आर्यमान आहे. मेधा या मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी होत्या अन् त्यातच त्यांचे 2014 साली न्यूयॉर्क येथे उपचार चालू असतानाच  निधन झाले.

त्यानंतर त्यांनी 2018 साली जसलीन माथरू सोबत नात्यात (लिव इन) राहण्याचा निर्णय घेतला. त्यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली. या जोडीने ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमध्ये भाग घेतल्यानंतर तर त्या टीकेला आणखीनच धार आली होती. दोघेही शोमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी ‘ती माझी फक्त एक शिष्या आहे’, असे सांगत ‘या सर्व अफवा आहेत’, असे मिडियासमोर सांगितले होते. आता हे किती खरे आणि किती खोटे हे ते दोघेच जाणोत; पण या सर्व प्रकारच्या चर्चेमुळे हे भजनसम्राट ‘विवाहसम्राट’ आहेत, अशीच चर्चा त्यावेळी उठली होती.

खरेतर कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य पाहू नये, असे म्हणतात. त्यापेक्षा त्यांचे करियर बघावे, असाच एक अलिखित नियम आहे; पण आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती कलाकार म्हणून मोठी होते, तेव्हा तिचे वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक राहत नाही, हे दुर्दैवाने सत्य आहे. (Shapith Gandharva) त्यामुळेच आपल्या संस्कृतीत एकापेक्षा जास्त विवाह मान्य केले जात नाहीत. काहीही असो पण उत्तम आवाज, संगीताचा गाढा अभ्यास असूनही अनेक भजने गाऊन भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनूप जलोटा पार्श्वगायक म्हणून का प्रस्थापित होऊ शकले नाहीत, हे देवच जाणो. कलाकाराला वय, जात, धर्म नसतो असे म्हणतात. त्यामुळे यापुढे तरी त्यांना पार्श्वगायनात यश मिळो, इतकीच प्रार्थना परमेश्वराकडे करणे आपल्या हातात आहे. त्यांनी भजने गाऊन आपल्याला जो असीम आनंद दिलाय, त्यासाठी तरी हा हक्क नक्कीच असेल, नाही का?

 

अनूपजींना पुढील कारकिर्दीसाठी आणि उर्वरित आयुष्यासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा!

 – विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.