Shapith Gandharva Part 4 : शापित गंधर्व – भाग चौथा – प्रमोद महाजन

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : त्यांच्याकडे रूबाबदार व्यक्तिमत्त्व होते, प्रचंड व्यासंग होता, ‘वक्तादशसहस्त्रेषु’ म्हणून त्यांना संपूर्ण भारतभरच नव्हे, तर जगभर ओळखले जात होते. अस्खलित हिंदी, इंग्रजी, मराठी भाषेतली त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे एकअप्रतिम पर्वणी असे, मेजवानी असे. राजकारणात असूनही त्यांच्याबद्दल समाजात, मिडीयात आदराने बोलले जात असे. (Shapith Gandharva Part 4) एवढेच नाही तर आपल्या पक्षातच नव्हे तर विरोधी पक्षातही त्यांच्याबद्दल आदर बाळगला जात असे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतिशय अभ्यासू आणि विश्वासू स्वयंसेवक म्हणून त्यांची जगभर ओळख होती. ते व्यक्तिमत्त्व म्हणजेच एक उच्चविद्याविभूषित, कुलीन राजकारणी आदरणीय प्रमोदजी व्यंकटेशराव महाजन!

राजकारणात असूनही जगभर वंदनीय असलेल्या भारतीय राजकारणातले एक महान नेते आणि माजी पंतप्रधान  भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी आणि मानसपुत्र म्हणूनही ओळखले जात होते. एवढेच नव्हे तर मराठी माणूस असूनही, अल्पसंख्याक असूनही देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही त्यांच्या नावाचा एक आदरयुक्त दबदबा होता. लवकरच ते देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास सर्वपक्षीय नेत्यात, मीडियातही व्यक्त केला जात होता. प्रत्येक मराठी माणसाला आपला माणूस पंतप्रधान व्हावा ही अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे; एक सोनेरी स्वप्न आहे. ती इच्छा पूर्ण होईल असे वाटत असतानाच अचानक घात झाला. या स्वप्नाचा चुराडा झाला. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश प्रमोदजींच्या अकाली मृत्यूने(घातपाताने) धाय मोकलून रडला, कोसळला.

खऱ्या अर्थाने एक शापित गंधर्व यांना म्हटले तर काही गैर असणार नाही. त्यांना परमेश्वराने सर्व काही दिलं. एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्म घेऊनही, उच्चविद्याविभूषित असूनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आणि नंतर राजकारणाच्या माध्यमातून स्वतःचे करियर करायचे ठरवले. त्यात त्यांना ना घरच्यांनी अडथळा आणला, ना नशिबाने, ना दैवाने. (Shapith Gandharva Part 4) आले तर त्यात यशच यश. तेही इतके मोठे की एका सामान्य घरातला मुलगा असूनही तो एक दिवस देशाच्या सर्वोच्च पदावर नक्कीच पोहचेल, अशी  चर्चा जगभरातल्या मीडियावर होत असे.

सर्व काही स्वप्नवत होते! मध्यमवर्गीय माणसाचे स्वप्न नेहमीच भंग होते, या समजाला अपवाद होणार नाही, असे वाटत असतानाच ज्या परमेश्वराने त्यांना सर्व काही स्वप्नवत वाटावे असे भाग्य दिले, त्या भाग्याला ऐन साठीच्या आतच नजर लागली. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ असे पूर्वीपासूनच का म्हटले जाते, याची दुःखद प्रचिती उभ्या जगाला तेव्हा आली, जेव्हा त्यांच्या पाठच्या सख्ख्या भावाने त्यांचा त्यांच्याच घरी गोळ्या झाडून खून केला. तो का केला? कसा केला? या जीवघेण्या प्रश्नांची उकल आजतागायत नाहीच झाली. (Shapith Gandharva Part 4) कोर्ट-कचेरी झाली, खटला भरला, निकालही आला; पण त्या एका घटनेने त्यांच्यासह तमाम मराठी मनाच्या सुंदर स्वप्नाचा चुराडा झाला तो झालाच! एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, राजयोग असलेले, प्रगल्भ राजकारण करू शकणारे प्रमोदजी! त्यांचा अकाली घात का झाला, या प्रश्नाचे उत्तर तो देव सोडला तर कोणाकडेही नाही.

प्रमोदजी यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. पण त्यांच्या वडिलांनी चरितार्थासाठी उस्मानाबाद येथे स्थलांतर केले. त्यानंतर त्यांनी अंबेजोगाई येथेही खूप वर्षे वास्तव्य केले. योगेश्वरी विद्यालय-महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारितेचीही पदवी घेतली. त्याआधी त्यांनी भौतिकशास्त्राची पदवी सुद्धा घेतली होती. 30 ऑक्टोबर 1949 रोजी प्रमोदजीचा जन्म झाला. त्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी होत्या.(Shapith Gandharva Part 4) ते दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ होते.

बालपणापासून अतिशय तेज बुद्धी असल्याने प्रमोदजींना अभ्यासाव्यतिरिक्त इतर वाचनाचीही जबरदस्त आवड होती. वाचनाने माणूस अधिकच समृद्ध होतो म्हणतात ते काही चुकीचे नाही. अंबेजोगाई या शहराला एक मोठा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिकही वारसा आहे. येथे असतानाच त्यांना संघाच्या शाखेची  ओळख झाली आणि ओढही लागली. आधी अभाविपमुळे आणि नंतर संघामुळे त्यांचे मुळातच तेजस्वी असलेले व्यक्तिमत्त्व अधिकाधिक प्रभावी होत गेले.

हजरजबाबी भाषणे, तल्लख बुद्धी आणि माणसे जोडायची सवय- यामुळे अल्पावधीतच प्रमोदजी वलयांकित झाले. त्यातच त्यांची ओळख मराठवाड्यातले आणखी एक मोठे नाव असलेल्या गोपीनाथराव मुंढे यांच्यासोबत झाली. या जोडीने आधी मराठवाडा, मग राज्य आणि मग देशभर आपले नाव  गाजवले. बघता-बघता ही जोडी अतिशय प्रसिद्ध झाली. राज्य मुंढे साहेबांकडे तर दिल्ली प्रमोदजीकडे- असा जणू अलिखित संकेत होता. (Shapith Gandharva Part 4) त्यातच 1980 च्या दरम्यान राज्यभर जोर पकडत असलेल्या शिवसेनेसोबत भाजपाची महायुती झाली. ती युती होण्यामागे आणि तिची पाळेमुळे आणखी घट्ट होण्यात प्रमोदजींचा वाटा खूप मोठा होता, असे म्हटले जायचे. ते एकाच वेळी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान अटलजी या दोघांचेही अतिशय जवळचे शिलेदार होते.

यानंतर त्यांच्या आयुष्यातला खरा सुवर्णकाळ सुरू झाला. अटलजी यांनी त्यांना केंद्रात नभोवाणी आणि दूरसंचार मंत्रिपदाची मोठीच जबाबदारी दिली. मुळातच कॉर्पोरेट मेंदू आणि कौशल्य असलेल्या प्रमोदजींनी या संधीचा अतिशय जबरदस्त फायदा उचलत आपले नाव आणि त्याचा दबदबा दिल्ली दरबारात अल्पावधीतच निर्माण केला आणि तो दबदबा कायमस्वरूपी राहील, अशीच व्यूहरचनाही केली. (Shapith Gandharva Part 4) महान पंतप्रधान म्हणून ओळखले जाणाऱ्या अटलजींचे ‘मानसपुत्र’ आणि ‘भाजपाचे लक्ष्मण’ म्हणून त्यांना संबोधले जाऊ लागले. राम म्हणून अर्थातच तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांचा उल्लेख होत असे. वय, ज्ञान, कार्पोरेट विश्वातला त्यांचा दबदबा प्रमोदजींना भावी पंतप्रधान म्हणून दिवसेंदिवस पुढे आणत होता.

हे अतिशय सुखद आणि दृष्ट लागणारे स्वप्न फुलत असतानाच तो काळा दिवस आला. 22 एप्रिल 2006 रोजी ते मुंबई येथील आपल्या निवासस्थानी असताना त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजन त्यांच्या घरी सकाळी साडेसात वाजता आला. प्रमोदजीची पत्नी रेखा महाजन यांनी त्यांना दार उघडून घरात घेतले आणि त्या त्याच्यासाठी चहा बनवायला स्वयंपाकघरात गेल्या. पण थोड्याच वेळात त्यांना बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला. त्या त्वरेने येऊन बघतात तर काय!  प्रमोदजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते, तर प्रवीण त्यांना धक्का देऊन घराबाहेर पडला होता. माहिती मिळताच त्वरित तिथे पोचलेल्या गोपीनाथरावांनी प्रमोदजींना लगेच दवाखान्यात नेलेही; पण अनेक मोठ-मोठ्या डॉक्टरांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, जगभरातल्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थना, पूजा-अर्चा,जप-तप; कशा-कशालाही यश आले नाही.

अखेर 3 मे 2006 रोजी दवाखान्यात असतानाच त्यांची प्राणजोत मावळली आणि एक महान व्यक्तिमत्त्व वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी अकाली परलोकात निघून गेले. प्रवीण महाजनवर खटला चालवला गेला. अतिशय मोठ्या व्यक्तिमत्त्वावर त्याने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात सरकारने सर्व बाजूंचा विचार करून गुप्तरीतीने खटला चालवला अन् गोपनीयता पाळत त्यातले अनेक कबुलीजबाब गुप्तच ठेवले. (Shapith Gandharva Part 4) दरम्यान, पॅरोलवर असतानाच प्रवीण महाजन याचेही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्याआधी त्याचे ‘माझा अल्बम’ हे पुस्तक प्रकाशित झाले; ज्यात त्याने अनेक खळबळजनक दावे केले होते.

का, कसे, केव्हा- असे अनेक प्रश्न तसेच अधांतरित ठेवून प्रमोदजी आपल्या अकाली मरणाने जगभरातल्या त्यांच्या अगणित चाहत्यांना दुःखात टाकून कधीही परत न येण्यासाठी निघून गेले. आजही त्यांचा विषय निघाला की, ‘दिल्लीवर अंकुश मिळवू शकला असता, असा आश्वासक मराठी वीर (नेता)’ असेच त्यांच्याबद्दल मनात आल्याशिवाय राहत नाही. या प्रगल्भ, सुसंस्कृत आणि महान राजकीय नेत्याला आणि एका व्यासंगी व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली!

-विवेक कुलकर्णी

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.