Pune News : धक्कादायक.., फक्त 3 शाळा,12 रुग्णालयांनीच केले ‘फायर सेफ्टी ऑडिट’!

एमपीसी न्यूज : गेल्या चार वर्षांत शहरातील अवघ्या 3 शाळा आणि 12 रुग्णालयांनीच आपल्या इमारतींचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. फायर सेफ्टी ऑडिट झालेल्या इमारतींच्या यादीत खुद्द पुणे महापालिकेसह राज्य सरकारच्या, बड्या नामांकित संस्था, ट्रस्ट, व्यक्तींच्या खासगी मालकीच्या शाळा, रुग्णालयांचा समावेश नसल्याचे आढळून येत आहे. यानिमित्ताने विद्यार्थी आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत महापालिका, सरकार आणि खासगी संस्था गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.   

महाराष्ट्र आग प्रतिबंधक जीव संरक्षण कायदा, 2006 नुसार, रुग्णालय व शाळेच्या इमारतींचे नियमित ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करण्याची जबाबदारी ही त्या इमारतीची मालकी असलेल्या व्यक्ती किंवा संस्थेकडे असते. या कायद्याच्या कलम 3 मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्ती अथवा संस्थेने परवानाधारक एजन्सीकडून वर्षातून दोन वेळा इमारतीचे ‘फायर सेफ्टी ऑडिट’ करून घ्यायचे असून, या तपासणीचे प्रमाणपत्र दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात अग्निशमन विभागाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रमोद डेंगळे आणि तुषार उदागे यांनी पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे माहिती अधिकार अर्ज सादर करत, गेल्या चार वर्षांत शहरातील किती शाळा आणि रुग्णालयांनी फायर सेफ्टी ऑडिट अहवाल सादर केला, याचा तपशील मागविला होता. त्यावर अग्निशमन विभागाने दिलेल्या उत्तरात 2016 ते 2019 या कालावधीत फायर सेफ्टी ऑडिट अहवाल सादर केलेल्या शाळा व रुग्णालयांची यादी नमूद केली आहे. त्यामध्ये शहरातील अवघ्या तीन शाळा आणि बारा रुग्णालयांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात गेल्या चार वर्षांत शहरातील एकूण तीन शाळा आणि बारा रुग्णालयांनीच फायर सेफ्टी ऑडिट करून घेतल्याची नोंद आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या शाळा आणि रुग्णालये, ससूनसारखे सरकारी रुग्णालय, धर्मादाय आणि खासगी संस्थांच्या मालकीच्या रुग्णालयांनीही गेल्या चार वर्षात फायर सेफ्टी ऑडिट अहवाल सादर केल्याचे दिसून येत नही. त्यामुळे शाळा, रुग्णालये इमारतींचे फायर सेफ्टी ऑडिट करून घेण्यास टाळाटाळ करत असून, खुद्द अग्निशमन विभागही या तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उदासीन दिसत आहे. त्यामुळे रुग्णांच्या व विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.