Maratha Akrosh Morcha : सोलापुरात आज मराठा आक्रोश मोर्चा

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटून उठला आहे. आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर मध्ये आज (रविवार, 4 जुलै) मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सोलापूर मधील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून सकाळी 11 वाजता या मोर्च्याला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा जाणार आहे.

दरम्यान, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असली तरी आंदोलक मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, नारायण राणे, रामदास आठवले यांना या मोर्चासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र यापैकी कुणीही मोर्चाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. शहरात येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत जाणार आहे. मात्र पोलिस चार पुतळा चौकात मोर्चा थांबवतील, अशी माहिती आहे.

तसंच या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड यांच्यासह सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून अतिरिक्त पोलिसांची तुकडी मागवण्यात आली आहे.  

आक्रोश मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर व जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. जमावबंदीचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसंच एसटी बससह इतर वाहनांसाठी वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

दरम्यान, आम्ही शांततेत मोर्चा काढणार असून पोलिसांनी सहकार्य करावे, असे आवाहन लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. मात्र मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकास राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.