Pune News : जून महिन्यात 7लाख 33 हजार 82 पुणेकरांचे लसीकरण 

एमपीसी न्यूज : गेल्या सहा महिन्यापासून संथगतीने सुरु असणाऱ्या पुण्यातील लसीकरणाचा वेग जून महिन्यात वाढल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यात 7लाख 33 हजार 82 जणांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांचा समावेश आहे.  

जून महिन्यात झालेले लसीकरण हे पुण्यात आतापर्यंत एकाच महिन्यात झालेले सर्वाधिक लसीकरण आहे. जानेवारी ते मे अखेरपर्यंत शहरातील लसीकरण अडखळत सुरू होते. त्यामुळे 10 लाख लसींचा टप्पा गाठण्यासाठी 28 मे पर्यंतची वाट पहावी लागली होती. 2 जुलैपर्यंत शहरात 18 लाख 13 हजार 516 जणांनी लस घेतली आहे, अजूनही शहरासाठी 46 लाख डोसची आवश्‍यकता आहे.

आगामी काळात लसीकरणाचा वेग आणखी वाढवण्याची रणनीती पुणे महानगरपालिकेने आखली आहे. कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्यात येईल. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.