Pimpri : पुरस्कृत उमेदवारांनी युतीबरोबर जाणार नाही असे जाहीर करावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज – चिंचवड व भोसरी विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवारांनी निवडणुकीनंतर ते कायम महाआघाडीबरोबरच राहतील. युतीला आतून, बाहेरुन किंवा कसलाही पाठींबा देणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली. महाआघाडीचा धर्म पाळत काँग्रेस पिंपरी विधानसभेत अण्णा बनसोडे यांना पाठिंबा देत आहे, असेही साठे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक प्राधिकरण आकुर्डी येथे आज (शुक्रवारी)  (11 आयोजित करण्यात आली होती. यावेळी पिंपरी विधानसभेचे महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर कविचंद भाट, काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, प्रदेश काँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षा शामला सोनवणे, राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या बिंदू तिवारी, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रसेच्या उपाध्यक्षा निगार बारस्कर, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेल शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख आदी उपस्थित होते.

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे शहरातील तीनही जागा गमवाव्या लागल्या. पिंपरीत त्यावेळी काँग्रेसला पडलेली मते ही काँग्रेसच्या उमेदवाराची नसून काँग्रेसची विचारधारा मानणा-या मतदारांची होती आणि त्या निवडणुकीत अण्णा बनसोडे अवघ्या अडीच हजार मतांनी पराभूत झाले होते. आता काँग्रेसची हक्काची मते अण्णा बनसोडे यांना मिळतील आणि 24 ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर त्यांचा विजयानंतर पहिला सत्कार काँग्रेसच करेल, असे साठे म्हणाले.

माजी आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणतीही अपेक्षा न बाळगता पिंपरी विधानसभेत काम करीत आहेत, पक्षाचे आदेश पाळत आहेत ही जमेची बाजू आहे. मी उमेदवार या नात्याने सर्व काँग्रेसच्या व महाआघाडीतील कार्यकर्त्यांचा सन्मान राखेल. माझ्याकडून कोणताही दुजाभाव होणार नाही, अशी ग्वाही देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.