Break The Chain : 50 टक्के क्षमतेने उद्योगधंदे सुरू, ‘असे’ आहेत नियम व अटी 

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज (बुधवार, दि.14) रात्री आठपासून संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. आज रात्री 8 पासून पुढचे पंधरा दिवस कुणालाही कारण नसताना घरा बाहेर पडता येणार नाही. दरम्यान, या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, 50 टक्के क्षमतेने काही कारखाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

शासन आदेशानुसार, आवश्यक सेवेसाठी लागणारा माल तयार करणारे कारखाने पूर्ण क्षमतेनुसार सुरू राहतील. निर्यातीचे सामान तयार करणारे कारखाने, ज्यांना माल बाहेर पाठवायचा आहे. ज्या कारखान्यांमध्ये एकदम काम थांबवता येणार नाही आणि जास्त वेळ लावल्याशिवाय उत्पादन पुन्हा सुरू होऊ शकणार नाही अशा सर्व कारखान्यांना 50 टक्के क्षमते सह काम सुरू ठेवता येईल. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने यावर नजर ठेवावी व सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहे याची खात्री करावी असे आदेशात म्हटले आहे.

– कामगारांना राहण्याची व्यवस्था असणारे सर्व उद्योग किंवा त्याच परिसरातील कामगार किंवा इतर ठिकाणांहून येणारे कामगार ज्यांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था असणारे उद्योग सुरू राहतील.

– कंपनीच्या व्यवस्थापन विभागातील दहा टक्के कर्मचारी अधिकाऱ्यांना बाहेरून येऊन काम करता येईल.

– ज्या स्टाफ मधील कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची गरज नाही असे कारखाने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करू शकतात.

– व्यवस्थापन, कर्मचारी, प्रशासना मधील स्टाफच्या सगळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना शक्य तेवढ्या लवकर लसीकरण करून घ्यावे लागेल. जर हे कारखाने भारत सरकारच्या कार्यस्थळ लसीकरण अटीत बसत असतील, तर त्यांना लसीकरणाची व्यवस्था करावी लागेल.

– सर्व येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शरीराचे तापमान तपासून नियमांचे पालन करावे लागेल.

– एखादा कर्मचारी/ कामगार पॉझिटिव्ह आढळला तर, त्याच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या कामगारांना विलगीकरणात ठेवावे, या काळात सर्व कामगारांना पगार द्यावा लागेल.

– ज्या कारखाना किंवा कंपनीत 500 पेक्षा जास्त कामगार असतील, त्यांनी स्वतःची क्वारंनटीन सुविधा उपलब्ध करावी. सदर केंद्रांमध्ये सर्व मूलभूत सुविधा असाव्यात आणि जर ही सुविधा कंपनीच्या परिसराबाहेर असेल तर, सर्व सुरक्षा उपाय करून पॉझिटिव्ह व्यक्तीला त्या केंद्रापर्यंत घेऊन जावं लागेल.

– एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला तर, पूर्ण कारखाना सॅनीटाइज करेपर्यंत काम बंद ठेवावं लागेल.

– गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी भोजन आणि चहा ब्रेक टाळावेत.

– सार्वजनिक शौचालय वारंवार सॅनी टाईज करावीत.

– एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना पगारी रजा द्यावी‌. या कामगारांना गैरहजर असल्याकारणाने कामावरून काढून टाकता येणार नाही.

दरम्यान, आदेशात नमूद न केलेल्या सगळे उद्योग/कारखान्यांने संचारबंदी कालावधीपर्यंत उद्योग बंद ठेवावा असे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.