Talegaon Dabhade: तळेगावच्या 73.43 कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेला शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेला राज्य शासनाने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासनादेश आज काढण्यात आला आहे, अशी माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ही भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे तळेगाव दाभाडे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ही महत्वाची योजना मंजूर केल्याबद्दल तळेगावकर जनतेच्या वतीने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानतो, असे भेगडे म्हणाले.

या योजनेसाठी एकूण 73 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 15 टक्के म्हणजे 11 कोटी एक लाख 45 हजार रुपये खर्च तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला करावा लागणार आहे. उर्वरित 85 टक्के म्हणजे 62 कोटी 41 लाख 55 हजार रुपये अनुदान राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. यात योजनेअंतर्गत तीन मैलाजल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातील पहिल्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 2.45 दशलक्षलीटर, दुसऱ्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 2.20 दशलक्षलीटर, तर तिसऱ्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 9.70 दशलक्षलीटर इतकी असणार आहे. त्यामुळे शहरातील 14.35 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. कार्यादेश निघाल्यापासून दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावी, असे शासकीय आदेशात म्हटले आहे.

या योजनेला मंजुरी देताना शासनाने नगरपरिषदेच्या कामकाजाचे एक वर्षात पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य केले आहे. त्यात ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद संगणक करणे बंधनकारक आहे. उचित उपभोक्ता कर लागू करून किमान 80 टक्के करवसुली करण्याची अट आहे. नगरपालिका क्षेत्रातील मिळकत कराचे पुनर्मूल्यांकन प्रकल्प मंजुरीपासून एक वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली पहिल्या वर्षात 80 टक्के तर त्या पुढील वर्षी 90 टक्के करण्याची अटही शासनाने घातली आहे. घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे नगरपरिषदेवर बंधनकारक राहील. कोणत्याही कारणास्तव प्रकल्प खर्चात वाढ झाली तर त्याची जबाबदारी नगरपरिषदेवर राहील, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.