Pune News : अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीची कडक अंमलबजावणी

एमपीसी न्यूज : शहरात अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. विनाकारण भटकंती करणे, सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.

ख्रिसमस आणि नववर्षांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून केली जाणारी गर्दी टाळण्यासाठी राज्यातील महानगरपालिका हद्दीत कर्फ्यूची अमंलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार दूध, भाजीपाला, मेडीकल, डॉक्टर, नर्सेस, पत्रकार यांना संचारबंदीतून सवलत देण्यात आली आहे. त्याशिवाय अत्यावश्यक प्रवासासाठीही सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्ससह नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. संचारबंदीतही शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा लागू राहणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

संचारबंदीत हे राहणार सुरू

मेडीकल, दवाखाने, भाजीपाला,  अत्यावश्यक प्रवासाची वाहने, पत्रकार, डॉक्टर, नर्सेस, अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी यांनाही तात्पुरत्या कालावधीत सूट देण्यात आली आहे. त्याशिवाय हॉटेल, लॉज, विविध कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहे.

पेट्रोलिंग नाकाबंदीवर भर

विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग आणि नाकाबंदीवर भर देण्यात आला आहे. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषतः खिसमस आणि  नववर्षांच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच बसून नववर्षांचे स्वागत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.