YCM Hospital News: ‘लक्ष्य’ उपक्रमातांतर्गत YCMH च्या प्रसूती कक्षाचा होणार कायापालट

अर्भक , माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामार्फत गर्भवतींच्या सक्षमीकरणासाठी ‘लक्ष्य’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.

त्यामुळे या ठिकाणी लेबर रुमसह ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक टेबल, बेड, स्तनपान कक्षासह प्रसूती कक्षाचा कायापालट होणार आहे. परिणामी ,नवजात अर्भक मृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.

सध्या ‘वायसीएम’ मध्ये दरवर्षी दहा हजार प्रसूती होतात. कोरोना काळात 280 प्रसूती झाल्या. सध्या प्रसूती कक्षाची जागा अपुरी पडत असून, दहा ते बारा टेबलची गरज आहे. मात्र, सध्या केवळ चार टेबल आहेत. सुरक्षित प्रसूतीसाठी कर्टन आणि स्वतंत्र ब्लॉकची गरज आहे. त्याचबरोबर हायड्रोक्लोरिक बेडची आवश्यकता आहे. जोखमीच्या प्रसूतीसाठी योग्य ते वातावरण प्रसूती कक्षात असणे अपेक्षित आहे. या माध्यमातून गर्भवतीसाठी अतिदक्षता विभागात स्वतंत्र जागाही राखीव ठेवली जाणार आहे. हे बदल ‘लक्ष्य’ उपक्रमांतर्गत केले जाणार आहेत.

यासाठी काही डॉक्टर आणि इतर कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही तज्ज्ञांचे प्रशिक्षणही असेल. बालरोग तज्ज्ञांचा स्वतंत्र सल्ला असेल.त्याचबरोबर वेळोवेळी या कक्षाचे ऑडिट होणार आहेत. प्रसूती कक्षाची गुणवत्तेसाठी गुणांकन ठेवलेले असून प्रशस्तिपत्रक सरकारच्यावतीने दिले जाणार आहे. प्रसूती कक्ष आणि साहित्याचे निर्जंतुकीकरण, बायोमेडीकल विल्हेवाट अशा लहान मोठ्या गोष्टीही कटाक्षाने पाळल्या जाणार आहेत. शून्य ते अठरा महिन्याच्या बाळापर्यंत प्रत्येक स्तरातून तपासण्या होणार आहेत.

याबाबत बोलताना स्त्री प्रसूती विभागप्रमुख प्रा. महेश आसलकर म्हणाले, 2017 मध्ये स्त्रीप्रसूती कक्षासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना  आल्या आहेत. त्याप्रमाणे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. भोसरी, आकुर्डी आणि जिजामाता रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे कक्षामध्ये सुधारणा झाल्यास गर्भवती महिलांची सुरक्षितता अधिक वाढणार आहे.त्यामुळे सुसह्य आणि सुखरुप प्रसूती होण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.