PCMC News: अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे; आयुक्तांनी बसविला मर्जीतील अधिकारी

एमपीसी न्यूज – राज्य सेवेतील दोन अतिरिक्त आयुक्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना आता तिसरे अतिरिक्त आयुक्तही राज्य सेवेतीलच आले आहेत. अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांची पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारने नियुक्ती केली. थोरवे यांनी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह साता-याचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्यासोबत काम केले. त्यामुळे आयुक्तांनी शिफारस करुन मर्जीतील अधिकारी आणल्याचे बोलले जावू लागले.

थोरवे यांची कोणत्या अतिरिक्त आयुक्तांच्या जागी नियुक्ती केली, हे आदेशात म्हटले नाही. त्यामुळे स्थानिक अधिका-यांसाठीच्या तिस-या अतिरिक्त आयुक्तपदाचा प्रभारी पदभार असलेल्या नगरसचिव उल्हास जगताप यांना खुर्ची सोडावी लागणार आहे. राज्य सेवेतील तिसरे अतिरिक्त आयुक्त आल्याने स्थानिक अधिका-यांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. पिंपरी महापालिकेचा समावेश ‘ब’ वर्गामध्ये समावेश झाला असून नवा आकृतीबंध, सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण नियम तयार केले.

PCMC News: उड्डाणपूल, शिल्प, कारंजे, वारसा स्थळांचे सुशोभीकरण

महापालिकेच्या आकृतिबंधाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. नवीन आकृतीबंधानुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण झाली आहेत. त्यातील दोन अतिरिक्त आयुक्त प्रतिनियुक्तवरचे आणि महापालिका अधिका-यांकरिता पदोन्नतीसाठी एक याप्रमाणे तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत राज्य सेवेतील जितेंद्र वाघ आणि प्रदिप जांभळे महापालिकेत कार्यरत आहेत. तर, स्थानिक अधिका-यांसाठी असलेल्या तिस-या अतिरिक्त आयुक्तांचा प्रभारी पदभार नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे 18 फेब्रुवारी 2021 रोजी दिला होता.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिका-यांसाठी असलेल्या अतिरिक्त आयुक्तपदावर पदोन्नती देण्याकरिता पालिकेतील एकही अधिकारी निकष पूर्ण करत नसल्याचे पालिका प्रशासनाने राज्य शासनाला कळविले होते. त्यानुसार राज्य शासनाने पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुनिल थोरवे यांची नियुक्ती केली आहे. थोरवे यांनी पालिकेत तत्काळ रुजू व्हावे असे आदेशात म्हटले आहे. याबाबतचा आदेश 18 नोव्हेंबर 2022 रोजी महसूल विभागाचे सह सचिव डॉ. माधव वीर यांनी काढला आहे.

दरम्यान, महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे साता-याचे जिल्हाधिकारी असताना थोरवे हे साता-याचे निवासी उपजिल्हाधिकारी होते. सिंह यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यामुळे सिंह यांनीच शिफारस करुन थोरवे यांना पालिकेत आणल्याचे बोलले जात आहे. आपल्या मर्जीतील अधिकारी सिंह यांनी आणल्याचे दिसते. थोरवे यांनी खेड, मावळचे प्रांत अधिकारी म्हणून काम केले. यापूर्वी पिंपरी महापालिकेतही सहाय्यक आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.