Talegaon Dabhade : कोरोना चाचणीसाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पुढे यावे – आमदार सुनील शेळके

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांची गुरुवार (दि.24) सकाळी 8 वाजल्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे.

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या काळात श्रेयवाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील 28  हजार कुटुंबातील नागरिकांची गुरुवार (दि.24) सकाळी 8 वाजल्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि.21) अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवकांना या मोहिमेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वतीने या टेस्ट साठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सर्व नागरिकांनी कोरोना टेस्टसाठी स्वयंप्रेरणेने पुढे येवून सहकार्य करावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले.

येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात गुरुवार (दि.17) दुपारी आयोजित केलेल्या कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट नियोजन बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी तहसीलदार मधुसूदन बर्गे, उप नगराध्यक्ष वैशाली दाभाडे, प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, नगरसेविका संगीता शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, अधिकारी एम जी बनसोडे, दिलीप गायकवाड, पद्मनाभन कुल्लरवार, संपत गावडे, अजित खरात, विशाल मिंड, मयूर मिसाळ, रसिका लामखेडे, स्मिता गाडे,अमृता नाईक, अभिजित गोंधळी, जयंत मदने, सुवर्णा काळे आदि उपस्थित होते.

आमदार शेळके पुढे म्हणाले, नगरपरिषद हद्दीतील 13 प्रभागात टेस्ट बाबत जनजागृती करण्याचे काम शुक्रवार (दि.18) पासून सुरु होणार आहे. गुरुवार (दि.24) सकाळी 8 वाजल्यापासून 26  क्षेत्रीय अधिकारी, 4 रुग्णवाहिका, 500  ऑक्सीमीटर, 500 थर्मलगन, 500 पल्समीटर, 1000 रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट, गरजेनुसार कोविड केअर सेंटर राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे, तोलानी मेमोरिअल इंदोरी व इंद्रायणी शासकीय मुलीचे वसतीगृहात आदि ठिकाणी सुरु करण्यात येणार आहेत. ”

मावळ मुळशीचे प्रांताधिकारी संदेश शिर्के म्हणाले, ‘या टेस्टसाठी यंत्रणा उभी करण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेवून कर्तव्य करायचे आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी टेस्टचे काम करण्यास नकार दिल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.

25 घरामागे दोन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः व माझ्या कुटूंबातील, समाजातील इतरांना कोरोना संसर्ग होणार नाही यांची दक्षता घ्या.

लोणावळा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार म्हणाले, लोणावळ्यात या टेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून  55000 लोकसंख्या असलेल्या शहरात त्या दिवसी 73 कोरोना बाधित रुग्ण सापडले.

तळेगाव दाभाडे शहरात सुमारे 75000 लोकसंख्या असून योग्य नियोजन करून इथेही टेस्ट मोहीम यशस्वीपणे राबविणार. सर्व नागरिकांना उपचार भेटणार असून त्यांना पूर्वीचे आजार तसेच ताप, सर्दी, खोकला असल्यास सांगा. मनातील भीती काढून टाका, असे आव्हान आवाहन यावेळी करण्यात आले.

दरम्यान, या बैठकीतून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे उठून गेल्याने उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.