Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भात सत्तारूढ भाजपने हॉटेलमध्ये घेतलेल्या संयुक्त आढावा बैठकीवरून शहरात उलट-सुलट चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची नगरपरिषदेच्या कामकाजासंदर्भातील संयुक्त आढावा बैठक माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी शहरातील इशा हॉटेल येथे घेतली. या बैठकीवरून शहरात मात्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या आढावा बैठकीत प्रत्येक अधिका-यांनी आपापल्या विभागाचा सर्व लेखाजोखा सादर केला.

या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, शहर अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, माजी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र भेगडे, कार्याध्यक्ष वैभव कोतुळकर, माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल यांचेसह नगराध्यक्षा चित्रा जगनाडे आणि फक्त भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

या आढावा बैठकीत मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांचे सह नगर परिषदेतील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या आढावा बैठकीत प्रत्येक अधिका-यांनी आपापल्या विभागाचा सर्व लेखाजोखा सादर केला. तर नगरसेवकांनी कामे होत नसल्याच्या तक्रारी मांडल्या.

सध्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात आलेल्या मरगळीमुळे सर्व विकासकामे थंडावली आहेत. काही कामे नगरपरिषदेमध्ये निधी उपलब्ध नसल्यामुळे ठप्प आहे. याची दखल घेऊन माजी राज्यमंत्री भेगडे यांनी अधिका-यांकडून अडचणी समजून घेतल्या.

नगरपरिषदेच्या सर्व विभागाचे विभागप्रमुख अधिकारी इशा हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला गेल्याने नगरपरिषदेचे प्रशासकीय कामकाज सुमारे तीन तास ठप्प झाले होते. प्रशासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना यामुळे या अधिका-यांची वाट पहात ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे पालिका परिसरात पक्षीय आढावा बैठकीची उलट-सुलट चर्चा रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.