Talegaon Dabhade News: विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसाठी आमदार शेळके यांनी दिले आणखी सहा लाखांचे अर्थसहाय्य

सह्याद्री स्कूल, जैन स्कूल व कृष्णराव भेगडे स्कूलला प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना फी सवलत देण्याबाबत झालेल्या बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे आमदार सुनील शेळके यांनी एकूण फीच्या पाच टक्के प्रत्यक्ष योगदान म्हणून तळेगाव दाभाडे येथील तीन शाळांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. आमदार शेळके यांच्या या योगदानाबद्दल पालक व विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षण संस्थाचालकांकडूनही आभार मानण्यात येत आहेत.

तळेगाव दाभाडे येथील सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूल व जैन इंग्लिश स्कूल या तीन शाळांना मिळून सहा लाख रुपयांचे धनादेश आमदारांचे बंधू उद्योजक सुदाम शेळके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी गोकुळ किरवे, मयूर झोडगे, संजय कासवा आदी उपस्थित होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना 35% सवलत देण्याबाबत 21 जून रोजी झालेल्या समन्वय बैठकीत सर्वानुमते सहमती झाली होती. यावेळी आमदार शेळके यांनी पाच टक्के फीचा भार उचलण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर आमदार शेळके यांनी प्रत्यक्ष कृतीतून मावळमधील पालकांना दिलेला शब्द पाळला.

तळेगाव दाभाडे येथील स्व. विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचालित सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नावे असलेला दोन लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष सुनील भेगडे व सचिव दत्तात्रय नाटक यांच्याकडे नुकताच सुपूर्त करण्यात आला.

तळेगाव दाभाडे येथील विद्या प्रतिष्ठान संचालित कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या नावे असलेला दोन लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत काकडे यांनी स्वीकारला.

तळेगाव दाभाडे येथील विश्वकल्याण एज्युकेशन सोसायटी संचालित जैन इंग्लिश स्कूलच्या नावे असलेला दोन लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे सचिव प्रकाश ओसवाल यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

स्नेहवर्धक संस्थेच्या बालविकास शाळेला पाच लाखांचा धनादेश देऊन आमदार शेळके यांनी अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली होती. फीमधील पाच टक्के वाटा उचलून आमदार शेळके यांनी पालक वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. टप्प्याटप्प्याने तालुक्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना विविध माध्यमातून मदत करणार असल्याचे आमदार शेळके यांनी यापूर्वीच सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.