Fort Raigad : तळेगाव दाभाडे ते किल्ले रायगड बस सेवा सुरु करावी; गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेची मागणी

एमपीसी न्यूज  – मावळ परिसरातून अनेक शिवभक्त रायगड दर्शनासाठी जात असतात.त्यांच्या सोयीसाठी तळेगाव दाभाडे ते रायगड किल्ला अशी बससेवा सुरु करावी, अशी मागणी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे खजिनदार शामराव ढोरे यांनी तळेगाव बस डेपो व्यवस्थापकांकडे गुरुवारी (दि.25) निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्यातून असंख्य शिवभक्त किल्ले रायगडाची वारी करतात, तर काही जण सहकुटुंब रायगडी दर्शना करीता जातात.आपल्या मावळ तालुक्यातून किल्ले रायगडावर थेट जाण्याकरीता अशी कोणतीही वाहतूकीची सोय नाही.यामुळे जे शिवभक्त सहकुटुंब, वैयक्तिक व सामूहिकरित्या जावू इच्छितात त्यांना अडचण होते.यासाठी तळेगाव दाभाडे – लोणावळा – पाली – किल्ले रायगड. (परतीचा मार्ग तसाच) किंवा तळेगाव दाभाडे – मुळशी – ताम्हिणी घाट – किल्ले रायगड. (परतीचा मार्ग तसाच) या मार्गे रोज तळेगावातून सकाळी  सहा वाजता सुटुन रायगड पायथा येथे साडेनऊ वाजता पोहचणे अपेक्षीत आहे.तसेच परतीच्या वेळी ती संध्याकाळी सहा वाजता निघून अंदाजे नऊ वाजता पोहचणे. याप्रमाणे चालू करण्याबाबत सुचवले आहे.यामुळे एका दिवसात किल्ले रायगडाचे व्यवस्थित दर्शन होवू शकेल.

या बससेवेमुळे पाली मार्ग गेल्यास गणेश भक्त यांना पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शनही करता येईल तसेच किल्ले सरसगड,किल्ले सुधागड या ठिकाणीही भेट देता येईल.तसेच मार्गात येणाऱ्या गावांनाही फायदा होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.