Talegaon : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तळेगावात भव्य मोर्चा

एमपीसी न्यूज -नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण पेटलेले असताना रविवारी तळेगाव दाभाडे येथे या कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली काढण्यात आली. मावळ नागरिक एकता मंचच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मारूती मंदिर याठिकाणी सर्वजण जमल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली.यावेळी तिरंगा हाती घेऊन तरुण अग्रभागी चालत होते. त्यानंतर १५० फुटी तिरंगा असलेला मोठा ध्वज आणि हातात कायद्याच्या समर्थनार्थ बोर्ड घेऊन नागरिक चालत होते. गाव भागातून मोर्चा पुन्हा मारुती मंदिर येथे आल्यानंतर छोटी सभा होऊन रॅलीची सांगता झाली.

या रॅलीत राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे,मावळ तालुका भाजप अध्यक्ष रविंद्र भेगडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मावळ तालुका कार्यवाह हेमंत दाभाडे, बजरंग दलाचे कार्यकर्ते संदेश भेगडे, सुनील गावडे सर, यशवंत कदम,वारकरी संप्रदायाचे नंदकुमार भसे,सहयाद्री प्रतिष्ठानचे सदानंद पिलाने, शिवदुर्ग संस्थाचे सुनील गायकवाड सहभागी झाले होते. चला देशासाठी उभे राहु सीएएला सपोर्ट करू, संविधानाचा विजय असो, भारत माता कि जय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. रॅलीमध्ये महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.

‘नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने तळेगावकर एकजूट झाले होते. हा कायदा कुठल्या धर्माच्या किंवा जातीच्या विरोधी जाणार नाही’.काही राजकीय पक्ष आणि लोकांद्वारे या कायद्याबाबत समाजात गैरसमज पसरविण्यात येत असल्याचा आरोप देखील यशवंत कदम यांनी केला. अशा अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्यांच्या निषेधार्थ तळेगावकर रस्त्यावर उतरले असल्याचं त्यांनी बोलताना सांगितले. सर्व जातीच्या लोकांनी या कायद्याच्या समर्थनार्थ एकत्रित यावे असे त्यांनी सांगितले.

वारकरी संप्रदायाचे भसे म्हणाले, देश हिताच्या दृष्टीने हा कायदा महत्वपूर्ण आहे. देशाच्या आस्थेचा विषय ज्यावेळी समोर येतो तेव्हा सर्वांनी एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाचा या कायद्याला पाठिंबा आहे. सर्वधर्म समभाव हेतूने नागरिक एकत्र येत आहेत.देशात घुसखोरी करून जे राहतात त्यांना ओळखण्यासाठी नागरिक नोंदणी होणे आवश्यक आहे. देशात जे वर्षानुवर्षे नागरिक राहत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका या कायद्याने नाही. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तळेगावत तैनात केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.