Talegaon MIDC : स्थानिक शेतकऱ्यांनी केले ‘ह्युंदाई’ कंपनीचे पेढे वाटून व फटाके वाजवून स्वागत

शेतकरी आणि उद्योग यांच्यात मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणारा अराजकीय मंच

एमपीसी न्यूज – तळेगाव एमआयडीसी परिसरातील बंद झालेल्या (Talegaon MIDC ) जनरल मोटर्सच्या जागी ह्युंदाई कंपनीने नुकत्याच केलेल्या एक सामंजस्य कराराचे स्थानिक शेतकरी व युवकांनी जाहीर स्वागत करून नवीन पायंडा घालून दिला आहे. महाराष्ट्रातील बहुदा अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी. त्या माध्यमातून उद्योग विश्वाला एक सकारात्मक संकेतही देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

 

नवलाख उंब्रे हद्दीतील तळेगाव औद्योगिक वसाहतीत बंद असलेल्या जनरल मोटर्स इंडियाच्या गेट समोर इंडस्ट्री फ्रेन्डली फार्मर्स फोरमच्या सदस्यांनी येऊ घातलेल्या ह्युंदाई मोटर्स इंडिया कंपनीचे जाहीर स्वागत केले. कंपनीच्या स्वागताचा फलक, फटाक्यांची आतषबाजी आणि पेढे वाटप करून त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे शेतकरी महिलांची लक्षणीय उपस्थिती, परिसरातील नवलाख उंब्रे, मंगरूळ, आंबी, बधलवाडी या गावांमधील तरुण, वयोवृध्द आणि स्थानिक गावकारभा-यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

 

 

Bawdhan Crime News : जिन्याचा दरवाजा तोडून बावधन येथे साडेतीन लाखांची घरफोडी

यावेळी सरपंच रामनाथ बधाले, ग्रामपंचायत सदस्य संतोष नरवडे, माजी सरपंच नागेश शिर्के हभप दिनकर शेटे, तानाजी पडवळ यांच्यासह स्टार्टअप युवा उद्योजक संग्राम कदम, राजू कडलक, गुरुदेव घोलप, दत्तात्रय कदम तसेच शेतकरी तानाजी पडवळ, गोरख शेटे, समीर जाधव,सरपंच भरत घोजगे यांच्यासह पंचक्रोशीतील गावकरी स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्योगांना स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याचे सर्वसाधारण चित्र असताना, तळेगाव एमआयडीसीत स्थानिक गावकरी व शेतकऱ्यांनी ह्युंदाई कंपनीचं स्वागत केलं, ही स्वागतार्ह घटना असल्याचे नामवंत उद्योजक रामदास काकडे आणि रणजित काकडे यांनी सांगितले.

शेतकरी आणि उद्योग यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी युवा उद्योजक रणजीत काकडे यांनी इंडस्ट्री फ्रेंडली फार्मर्स फोरमची (IFFF) स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या नियोजित फोरमला पंचक्रोशीतील शेतकरी, गावकरी आणि युवा पिढीतील नवउद्योग व्यावसायिक स्थानिक मंडळींचा प्रतिसाद मिळत आहे.

एकीकडे देशातील अनेक प्रकल्पांना राजकीय हेतूने प्रेरित होवून विरोध होत असताना तळेगाव एमआयडीसी परिसरातील शेतकरी आणि गाव कारभारी एकत्र येऊन उद्योगांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात सहकार्याचा चांगला संदेश गेला असून उद्योग व्यवस्थापनांनी समाधान व्यक्त केले असल्याचे नियोजित फोरमचे प्रवर्तक रणजीत काकडे यांनी सांगितले.

तळेगाव एमआयडीसी परिसरात उद्योगधंद्यांना पूरक असलेल्या बाबींची काकडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, येथे उद्योग व्यावसायिकांना आवश्यक असलेल्या पायाभूत सेवासुविधां उत्तम प्रकारच्या आहेत. एकेकाळी राजकीय हेतूने प्रेरित विविध कारणांसाठी काही लोकांनी अनेकदा येथे मोर्चे, आंदोलने केली होती. त्यातून काहीच हाती न लागल्याचे युवकांच्या लक्षात आल्याने आता सहकार्यातून समृध्दीकडे जाण्याचा निर्धार त्यांच्या या सकारात्मक भूमिकेतून व्यक्त होत आहे.

नियोजित इंडस्ट्री फ्रेन्डली फार्मर्स फोरमच्या उद्देशाबाबत काकडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. हा फोरम म्हणजे पूर्णतः अराजकीय व्यासपीठ होणार असून औद्योगिक प्रगतीत स्थानिकांचेही योगदान असावे म्हणून त्यांना प्रशिक्षित करणे, उद्योगधंद्यांना विरोध न करता त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सहकार्याची भूमिका घेणे, उद्योग व्यवस्थापनास स्थानिकांकडून अपेक्षित असलेल्या क्षमतांचा विकास करणे आणि मैत्रीपूर्ण वातावरणातून प्रगती साधण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.

तळेगाव एमआयडीसी मध्ये उद्योग सुरक्षित – रामदास काकडे

नवलाख उंबरे येथील जनरल मोटर्सचा प्लांट ह्युंदाई कंपनी घेत आहे. या निर्णयाचे स्वागत सर्व स्थानिक शेतकरी, युवक व महिलांनी मिठाई वाटप व फटाके वाजवून केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्थानिकांनी मिठाई वाटून, फटाके फोडून कंपनीचे स्वागत केले असेल. याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे. ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे तळेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग सुखरूप आहेत, हा विश्वास सर्व उद्योजकांमध्ये येईल. या भागात उद्योग, व्यवसाय वाढीस प्राधान्य मिळेल, अशा भावना ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे (Talegaon MIDC ) यांनी व्यक्त केल्या.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.