India vs England : भारतीय संघाने दाखवली झुंजार लढाऊवृत्ती

एमपीसी न्यूज (विवेक दि कुलकर्णी) – पहिल्या डावातली हाराकरी विसरून भारतीय संघाने दुसऱ्या डावात झुंझार खेळाचे प्रदर्शन करत आजच्या तिसऱ्या दिवसाखेर आम्ही अजूनही सामन्यात पराभूत मनस्थितीत नाही हे सिद्ध करणारा खेळ करत आपली लढावू वृत्तीचे जोरदार प्रदर्शन केले आहे. काल 345 धावांची आघाडी घेऊन खेळणाऱ्या इंग्लंड संघाला आज अगदी थोड्याच वेळात सर्वबाद करून सुरुवात चांगली केली.

साडेतीनशेहुन अधिक धावांची पिछाडी असताना दुसऱ्या डावात चांगली सुरुवात अपेक्षित होती,खरेतर के एल राहूल आणि रोहित शर्माने बऱ्यापैकी सुरुवात केलीय असे वाटत असतानाच राहुल दुसऱ्या डावात सुद्धा स्वस्तात बाद झाला आणि अपेक्षा ठेवून आजचा खेळ बघणाऱ्या करोडो भारतीय प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला खरा, पण त्यानंतर आलेल्या चेतेशवर पुजाराने जबरदस्त आत्मविश्वास दाखवत आजच्या दिवसांवर form is temprery class is permenet या सुभाषिताची प्रचिती दाखवणार खेळ करत आजच्या  दिवसावर आपली छाप सोडली.

आज त्याचे शतक होईल असे वाटत असतानाच अंधुक सूर्यप्रकाशामुळे आजचा खेळ थांबवावा लागला तेंव्हा तो कर्णधार विराट कोहली याच्यासह शतकाच्या उंबरठ्यावर नाबाद आहे.तत्पूर्वी रोहित शर्माने आजही आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला मुरड घालून संघहित डोळ्यापुढे ठेवून झुंजार खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले,मात्र तो मोठी इंनिंग करेल असे वाटत असतानाच रॉबिनसंच्या एका स्विंग चेंडूवर पायचीत झाला,त्याने 59 बहुमोल धावा करत पुजारासोबत 82 धावांची भागीदारी सुद्धा केली.

त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीवर आपल्या फॉर्म मध्ये नसल्याचे दडपण होते, मात्र त्यानेही पुजाराच्या खेळीने प्रेरीत होवून इंग्लंड संघाला नंतर एकदाही आनंद मिळू दिला नाही आणि संघाला दिवसाखेर दोन गडी बाद 215 अशा चांगल्या स्थितीत आणून ठेवले.

पुजाराने त्याच्यावर होणाऱ्या सर्व टीकेला बॅटने उत्तर देत नाबाद आणि आक्रमक 91 धावा करत आपला दर्जा सिद्ध केला. खरेतर जवळपास सहा षटकांच्या आसपासचा खेळ आजचा बाकी असल्याने दोघेही आपले वैयक्तिक विक्रम आजच पूर्ण करतील असे वाटत असतानाच अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला, तेंव्हा पुजारा 91 तर कोहली 44 धावावर नाबाद होते.

भारतीय संघ अजूनही 139 धावांनी मागे असून खेळाचे अद्यापही दोन दिवस बाकी असल्याने ही कसोटी निश्चितच निकाली होईल यात दुर्दैवाने काहींही शंका नसली तरी आजचा भारतीय संघाने केलेला झुंजार खेळ बघता आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते या वाक्प्रचाराची प्रचीती उद्या येऊ शकते अशी आशा करोडो भारतीय बाळगून आहेत.

आज सकाळी भारतीय गोलंदाजानी इंग्लिश शेपूट अधिक वळवळू दिले नाही आणि इंग्लंड संघाला 432 वर सर्वबाद केले.भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक चार बळी मिळवले तर बुमराह जडेजा आणि सिराज ने प्रत्येकी दोन दोन बळी घेतले.

आजची स्थिरावलेली नाबाद जोडी उद्या अशीच कामगिरी करेल अशी आशा बाळगायला कुठल्या भारतीय क्रिकेट रसिकाला आवडणार नाही बरे? पुजारा आणि कोहलीने उद्या आजचीच कामगिरी आणखी दोनेक तास चालू ठेवली तर कदाचित सामन्यात रंगत येवू शकते, नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.