Pimpri Corona Update: शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 500 पार, 224 रुग्ण झाले बरे

The number of corona positive in the pimpri-chinchwad city has crossed 500

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज 40 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. शहरातील कोरोनाग्रस्तांचा 500 चा आकडा आज (दि.30) पार झाला आहे. आज 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या 507 झाली आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे 224 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दि. 10 मार्च रोजी एकाच दिवशी शहरातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर एप्रिलपासून रुग्ण वाढीचे प्रमाण वाढले. दि. 22 मे पासून शहराला रेडझोनमधून वगळ्यात आले.

त्यामुळे महापालिकेने काही निर्बंध शिथिल करत दुकाने, उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली. पण, रेडझोनमधून वगळल्यापासून शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

दिवसाला 40 हून अधिक जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. सोसायट्या, मध्यमवर्गीय भागासह झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

दोन महिन्यात शहरातील रुग्णसंख्या 200 वर होती. पण, मागील बारा दिवसांत शहरात तब्बल 300 नवीन रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आनंदनगर झोपडपट्टीतील 180 रुग्णांचा समावेश आहे.

आता महात्मा फुलेनगर झोपडपट्टीतही रुग्ण सापडले आहे. यामुळे औद्योगिनगरीतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 82 दिवसांत पाचशेचा आकडा पार केला आहे.

दि.10 मार्च ते दि. 30 मे या 82 दिवसांत आज दुपारी बारावाजेपर्यंत शहरातील 507 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 275 सक्रिय रुग्णांवर महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

224 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ!

कोरोना पॉझिटिव्ह आहे. पण लक्षणे काहीच नाहीत. अशा रुग्णांचे पिंपरी-चिंचवड शहरात प्रमाण जास्त होते. केवळ चार ते पाच रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत होती.

परंतु, आता लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शहरातील 275 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 56 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 20 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

तर, 187 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. पण, त्यांच्यात कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.