Sassoon Hospital : तीन दिवसांपासून रुग्णावर उपचारच नाहीत, आरोग्य मंत्री ससून रुग्णालयाच्या डीनवर संतापले

एमपीसी न्यूज – राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी ससून रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील प्रमुख डॉक्टरांची चांगलीच खरडपट्टी काढली. ग्रामीण भागातून उपचारासाठी ससून रुग्णालयात आलेल्या एका तरुणाला दोन ते तीन दिवसांपासून उपचारच मिळत नसल्याने ते चांगले संतापले होते.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांच्यासह प्रमुख डॉक्टरांची भेट घेत तानाजी सावंत यांनी या सर्व डॉक्टरांना चांगलेच सुनावले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुकवर घटनेची माहिती दिली असून काही व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत.फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणत आहेत, आज माझ्याकडे ग्रामीण भागातून पुण्यात उपचारासाठी आलेले तरुण येऊन भेटले.ससून रुग्णालयात त्यांना 2 दिवसांपासून उपचार मिळत नाही अशी माहिती मला मिळाली होती. त्या तरुणाला उपचाराची गरज असताना 2 ते 3 दिवसांपासून रुग्णालयात येऊन देखील आरोग्य यंत्रणा उपलब्ध होत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही एक प्रातिनिधिक स्वरूपातील घटना समोर आली म्हणून आज स्वतः ससून रुग्णालयात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना रूग्णालयात कोणत्याही रूग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, तसेच लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून दर्जेदार आरोग्य सेवा वेळेवर पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचना यावेळी दिल्या.

जनतेच्या सेवेसाठी वैद्यकीय मदत अतिशय तत्पर असणे आवश्यक असते याचं भान सर्वांनी राखणं गरजेचे आहे.दरम्यान या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ चांगलेच वायरल झाले आहेत. त्यामुळे ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.