Baramati News : ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून टाकला दरोडा

पुणे एलसीबीने पाच जणांना केली अटक

एमपीसी न्यूज – ज्योतिषाकडे मुहूर्त पाहून चार जणांनी एका घरात दरोडा टाकला. महिलेचे हात पाय बांधून एक कोटी 11 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी (Baramati News) चार दरोडेखोर आणि त्यांना मुहूर्त सांगणारा ज्योतिषी यांना अटक केली आहे.

Pcmc : राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाला नवीन ‘मुख्य प्रवक्ता’

रामचंद्र वामन चव्हाण (वय 43, रा. फलटण, सातारा) असे अटक केलेल्या ज्योतिषाचे नाव आहे. सचिन अशोक जगधने (वय 30, रा. बारामती), रायबा तानाजी चव्हाण (वय 32, रा. इंदापूर), रवींद्र शिवाजी भोसले (वय 27, रा. बारामती), दुर्योधन उर्फ दीपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय 35, रा. फलटण) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी बारामती (Baramati News) तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला आणि तिच्या दोन लहान मुलांसह घरी असताना घराच्या कंपाउंडवरून उडी मारून चार चोरटे घरात आले.

त्यांनी महिलेला मारहाण करून हातपाय बांधले, तोंडात कापडाचा बोळा कोंबून घरात प्रवेश केला. घरातून 95 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल फोन असा एकूण एक कोटी सात लाख 24 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) दिला. एलसीबीने तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची ओळख पटवली. चोरी करणारे संशयित आरोपी हे एमआयडीसी परिसरात कामगार असल्याने त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ज्या महिलेच्या घरात चोरी झाली, त्या महिलेचा पती जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत.

म्हणून त्यांच्या घरी दरोडा टाकण्याचा कट रचला. आरोपी रामचंद्र चव्हाण हा ज्योतिषि असल्याने आरोपींनी त्याच्याकडून चक्क दरोडा घालण्यासाठी मुहूर्त काढला. ज्योतिषाने दिलेल्या मुहूर्तावर आरोपींनी दरोडा घातला. मात्र पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 76 लाख 32 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुणे ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.