Hinjawadi : पार्क केलेल्या तीन कारच्या काचा फोडून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून कारमधून ऐवज चोरून नेल्याच्या दोन घटना घडल्या. दोन्ही घटनांमध्ये एकूण 35 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत बुधवारी (दि. 4) हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना हिंजवडी फेज एक येथील रॉयल इंडियन या हॉटेलच्या पार्किंगमध्ये बुधवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडली. अमित मृत्युंजय ठाकूर (वय 35, रा. उंड्री, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर बुधवारी दुपारी दीड वाजता हिंजवडी फेज एक येथील रॉयल इंडियन हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. दरम्यान, त्यांनी त्यांची कार (एमएच 12 / आरटी 9847) हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्याच्या कारच्या काचा फोडून लॅपटॉप, दोन पर्स, कागदपत्रे असा 22 हजार 300 रुपयांचा तर शेजारच्या कारची काच फोडून लेडीज पर्स आणि 200 रुपयांची रक्कम चोरून नेली.

दुसरी घटना इंदिरा इन्स्टिट्यूट ताथवडे समोर सार्वजनिक रस्त्यावर बुधवारी (दि. 4) दुपारी पावणेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. सचिन चंद्रकांत धोत्रे (वय 33, रा. रहाटणी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धोत्रे यांनी त्याची कार (एमएच 14 / सीके 2928) इंदिरा इन्स्टिट्यूट समोर सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला लॉक करून पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप, लॅपटॉप चार्जर, आयफोन चार्जर, हेडफोन, इंटरनेट डोंगल आणि लॅपटॉप बॅग असा 13 हजरांचा ऐवज चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.