YCMH News : पदवी अभ्यासक्रमासाठी कक्ष उभारणार; पाच कोटींचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी रुग्णालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर कक्ष तयार करण्यात येणार आहे तसेच या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच कोटी 16 लाख रुपये खर्च होणार आहेत.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषद आणि त्यास परवानगी दिली आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून मानसोपचारशास्त्र, विकृतिशास्त्र, बालरोग, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, कान-नाक-घसा, भूलशास्त्र या सात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमता मंजुरी देण्यात आली आहे.

संत तुकारामनगर येथे वायसीएम रुग्णालयाची सातमजली इमारत आहे. या इमारतीतील सहाव्या मजल्यावर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी कक्ष तयार करण्यात येणार आहे. तसेच या अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.

या कामांसाठी सहा कोटी 62 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार राबविलेल्या निविदा प्रक्रियेत सात ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये ‘देव कन्स्ट्रक्शन’ यांनी निविदादरापेक्षा 22.17 टक्के कमी म्हणजेच पाच कोटी 15 लाख रुपये अधिक रॉयल्टी चार्जेस आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेस असा एकूण पाच कोटी 16 लाख रुपये दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा दर कमी असल्याने त्यांची निविदा स्वीकृत करण्यात आली. दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.