Tomorrow – Together Project लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप

एमपीसी न्यूज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधत लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने ‘टुमारो – टुगेदर’ प्रकल्पाअंतर्गत (Tomorrow – Together Project) शालेय विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

‘लिडींग इंडियन लेडीज अहेड’ हे ब्रीद वाक्य घेऊन मुलींच्या शिक्षणासाठी केवळ आर्थिक मदतच नव्हे तर भावी पिढीतील विद्यार्थिनीच्या व्यक्तीमत्त्व विकासावर कार्य करणाऱ्या लीला पूनावाला फाउंडेशनने आजपर्यंत 14000 पेक्षा जास्त मुलींना शिक्षणासाठी सहाय्य केले आहे.

‘टुमारो – टुगेदर’ प्रकल्पाअंतर्गत (Tomorrow – Together Project) दत्तक घेतलेल्या शाळेतील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनव कुंभार (आयकर आयुक्त, पुणे विभाग), अमित तलरेजा (चीफ फायनान्स ऑफिसर, ब्रोस इंडिया ऑटोमोटीव्ह लिमिटेड) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनच्या संस्थपिका लीला पूनावाला, विश्वस्त संस्थापक फिरोझ पूनावाला आणि फाऊंडेशनच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी विनिता देशमुख आणि सीईओ प्रीती खरे, स्कूल कमिटी सदस्य, शुभचिंतक आणि पालक वर्ग मुलींना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.

यावेळी ‘टुमारो टुगेदर’ या अंकाच्या 9 व्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रमुख पाहुणे आणि संपादकीय टीमच्या हस्ते करण्यात आले. या अंकात फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीमुळे मुलींना झालेले फायदे, विविध क्षेत्रात कामावर रुजू झालेल्या लीला ज्युनिअरचा आढावा देण्यात आला आहे.

यावेळी  दहावी आणि बारावीत 90 टक्के पेक्षा जास्त गुण संपादित केलेल्या, दत्तक घेतलेल्या शाळेतील लीला ज्युनिअरसचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना लेखणी स्वरूपातील ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच देण्यात आले.

यावेळी अभिनव कुंभार (आयकर आयुक्त, पुणे विभाग) म्हणाले, की “लीला आणि फिरोझ पूनावाला म्हणजे देवाचे दोन हात आहेत, जे समाजासाठी खूप मोठे कार्य करत आहेत.”

अमित तलरेजा (चीफ फायनान्स ऑफिसर, ब्रोस इंडिया ऑटोमोटीव्ह लिमिटेड) म्हणाले, “आम्हाला फाउंडेशनच्या या कार्यात सहभागी होता आले, हे खूप महत्त्वाचे आहे. असेच कार्य पुढे करत राहू.”

लीला पूनावाला म्हणाल्या की, पालकांनी मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मुलींना शिकवण्यासाठी पालकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. मुलींनी देखील खूप अभ्यास करून उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मुलींसाठी शिष्यवृत्ती बरोबर अनेक मार्गदर्शक उपक्रमात सहभागी व्हावे व गणित, इंग्रजी, विज्ञान आणि करिअर मार्गदर्शन याचा पालकांनी व मुलींनी फायदा घ्यावा. भविष्यात आपण आपल्या शैक्षणिक जीवनात मेहनत करून मोठ्या हुद्द्यावर नोकरी व्यवसाय करावा, हिच अपेक्षा पालकांप्रमाणे आमची देखील आहे.

आपल्या मार्गदर्शनात फिरोज पूनावाला यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.