Dehuroad News : घोरावडेश्वर डोंगरावर परदेशी वृक्षप्रेमींच्या हस्ते वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाच्या वतीने गेली दहा-बारा वर्ष हरित घोरावडेश्वर हा महात्वाकांक्षी प्रकल्प राबविला जात आहे. या ठिकाणी स्थानिक प्रजातींची हजारो झाडे लावून ती नैसर्गिक व मानवी आपत्तीवर मात करुन जगवली आहेत. निसर्ग मित्र विभागाच्या सातत्यपूर्ण व जिद्दीने सुरु असलेल्या या प्रकल्पाला ईटन या अमेरिकन कंपनीचे कार्यकारी रॉजेरिओ ब्रँको, (ब्राझील) यांनी भेट दिली व वृक्षारोपण केले.

यावेळी त्यांच्यासोबत उमाकांत नायर, जॅक्सन जॉर्ज, विनित दाते, मनेश म्हस्के, दत्तात्रय माळी, दयानंद भोसले व इटन कंपनीचे अधिकारी प्रकाश रुपये, योगिता लुंकड, माधुरी पवार, काजल निंबाळकर, केदार गिरिधारी आदी उपस्थित होते. भारताच्या भेटीला येण्यापूर्वीच रॉजेरिओ यांनी इटन कंपनीचे अधिकारी केतन भामरे व मंडळाचे पदाधिकारी भास्कर रिकामे यांचेकडून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती घेऊन हरित घोरावडेश्वर प्रकल्प भेट निश्चित केली होती.

आज डोंगरावर वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना श्रीकांत मापारी यांनी निसर्गमित्र विभागाच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर शास्त्रीय पध्दतीने चर घेऊन त्यामध्ये सुरु असलेल्या वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जाळपट्ट्या, गस्त, वणवे नियंत्रण इत्यादी कामाची माहिती दिली.

रॉजेरिओ यांनी हा प्रकल्प आस्थेने समजून घेतला, वृक्षारोपण केले, झाडांना पाणी घातले, त्याबरोबरच श्रमदान केले. या प्रकल्पाचे कौतुक करुन आगामी काळात श्रमदान व अन्य सर्व प्रकारचे नियमित सहकार्य करण्याच्या सूचना इटन कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना देऊन पुन्हा लवकरच येण्याचे आश्वासन दिले. प्रकल्प भेटीचे संपूर्ण नियोजन विजय सातपुते व दिपक नलावडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.