Talegaon News : अवैध वृक्षतोड प्रकरणी कारवाई करण्याची माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांची जिल्हाधिका-यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे ऐतिहासिक तळ्याच्या परिसरात अवैधरीत्या वृक्षतोड झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही वृक्षतोड करणा-यांवर कारवाई करण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी तळेगाव नगरपरिषदेकडून पोलिसांना लेखी सांगण्यात आले. मात्र पोलिसांकडून उचित कार्यवाही झाली नाही तसेच तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, पोलीस, लोकप्रतिनिधी यांनी याचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे अवैधरीत्या वृक्षतोड करणा-यांवर व त्यांना मदत करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

प्रदीप नाईक यांनी जिल्हाधिका-यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे कि, तळेगाव दाभाडे हे ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. इथली जैवविविधता ही शहराची ओळख आहे. तळेगाव दाभाडे येथे महावितरण कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या ऐतिहासिक तळ्यातील सुमारे 150 झाडे तोडली गेली आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने ऐतिहासिक तळ्यातून गाळ काढण्यासाठी देवराई – पर्यावरण संवर्धन व सामाजिक काम करणारी संस्था या संस्थेला काम दिले होते. हे काम संस्थेने महिनाभर केले. या कामाच्या वेळी संस्थेने तळ्याच्या परिसरातील तब्बल 150 पूर्ण वाढ झालेली झाडे तोडली. याबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने पंचनामा देखील केला आहे. सन 2015 ते सन 2017 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पंचनामा करून नगरपरिषदेने पोलिसांना याप्रकरणी कारवाई करण्याचे लेखी कळवले. मात्र त्यावर पोलिसांची कारवाई झाली नाही. तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तळेगाव दाभाडे पोलीस यांनी या प्रकरणी काहीही कारवाई केली नाही तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी देखील योग्य तो पाठपुरावा केला नाही. सामाजिक संस्था देवराई यांनी आपल्या अधिकृत कार्यक्षमतेचे उल्लंघन करून तळ्यात मशीन व जेसीबी लाऊन खोदकाम केले. जलचराला हानी पोहोचवली. वृक्षतोड व गौण खनिज मुरुमाचा गैरव्यवहार याची चौकशी करून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी प्रदीप नाईक यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.