Hinjawadi : इन्फोसिस कंपनीत चंदन चोरीचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज दोन मधील इन्फोसिस कंपनीच्या आवारात चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार आज (रविवारी) सकाळी उघडकीस आला. घटनेबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इन्फोसिस ही प्रतिथयश कंपनी आहे. तिच्या आवारात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी कंपनीच्या आवारात प्रवेश करून चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न केला. रात्री हा प्रकार उघडकीस आला नाही. परंतु हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्हीचा कडेकोट बंदोबस्त असताना कंपनीच्या आवारात घुसून चंदनाचे झाड तोडले जाते व ते चोरण्याचा प्रयत्न होतो याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, पोलिसांची गस्त अशा सर्वच यंत्रणा असून देखील चोरीचा प्रयत्न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी कंपनीच्या भोवताली असलेल्या तार कंपाऊंडला रात्रीच्या वेळी विद्युत करंट लावलेला असतो. तरीही हा चोरीचा प्रयत्न झाल्याने कंपनी व्यवस्थापन व पोलीस चक्रावून गेले आहे. पोलीसांनी घटना स्थाळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेमुळे आयटी परिसरातील सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.