Vadgaon News : मावळ तालुक्यात घरोघरी होणार कोविड चाचणी : आमदार सुनील शेळके

नागरिकांनी त्यांना असणाऱ्या आजाराबाबत आरोग्य विभागाला योग्य ती माहिती द्यावी. हि तपासणी मोहिम आठवड्यातून एक दिवस असे 8 आठवडे चालणार आहेत.

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच मावळातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या 20 ग्रामपंचायती तसेच कोरोना रुग्ण सापडलेल्या गावात जावून  घराघरात नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

वडगाव मावळ येथील मावळ तालुका बहुउद्देशीय सुविधा केंद्रात शनिवार (दि.12) दुपारी 12 वाजता कोरोना उपाययोजना बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी प्रांताधिकारी संदेश शिर्के, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, मुख्याधिकारी रवी पवार, कोविड 19 समन्वयक डॉ. गुणेश बागडे, सहाय्यक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, नगरसेवक राजेंद्र कुडे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ज्या नागरिकांना लक्षणे असतील त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देवून त्यांच्यावर संपूर्ण उपचार करण्यात येतील. यासाठी शहर व गाव तपासणीच्या वेळी आरोग्य, पोलीस, महसूल, पंचायत समिती, शाळा, सामाजिक संस्था व आमदार सुनिल शेळके युवा मंचाचे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

नागरिकांनी त्यांना असणाऱ्या आजाराबाबत आरोग्य विभागाला योग्य ती माहिती द्यावी. हि तपासणी मोहिम आठवड्यातून एक दिवस असे 8 आठवडे चालणार आहेत.

मावळ तालुक्यातील नागरिकांनी शहर व गाव कोरोना तपासणी मोहिमेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा. कोरोना उपचारासाठी मावळ तालुक्याला मुबलक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.

मावळ तालुक्यात शनिवारपर्यंत 2848  कोरोना बाधित रुग्ण सापडले असून शहरी भागात 1618  तर ग्रामीण भागात 1230 रुग्ण असून 832  रुग्ण उपचार घेत असून 103  रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याने मावळ तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार सुनील  शेळके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.