Stray dogs : मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – मोहननगर, महात्मा फुलेनगर आनंदनगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा (Stray dogs) सुळसुळाट झाला आहे. दुचाकीस्वारांच्या मागे मोकाट कुत्री धावतात. कुत्री दुचाकीमागे आल्याने मुलासह चाललेली दुचाकीस्वार महिला आणि मुलगा जोरात रस्त्यावर खाली पडले. त्यांना जबर मार लागला. हे केवळ पशुवैद्यकीय विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे घडले आहे. मोहननगर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, मोहननगर, महात्मा फुलेनगर, आनंदनगर, इंदिरानगर, साईबाबानगर, चिंचवडस्टेशन, काळभोरनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, परशुरामनगर आदी परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक कामगार यांच्या जीवीताला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोरात भुकंतात. लहान मुले दचकून घाबरून जागे होतात, हे मोकाट कुत्रे (Stray dogs) लहान मुले महिलांच्या अंगावर गुरगुरत धावून येतात. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

या परिसरात सेकंड व थर्ड शिफ्टला कंपनीत कामाला जाणाऱ्या येणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे ही कुत्री लागतात. त्यामुळे वाहने जोरात पळवावी लागतात. यामुळे यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून संबंधित विभागाला याबाबत योग्य उपाय योजना राबवण्याबाबत सक्त आदेश द्यावेत. यापूर्वीही याबाबत पत्र दिले होते. मात्र त्यावर आपण व आपल्या पशुवैद्यकीय विभागाने कुठलीही दखल घेऊन उपाय योजना राबवल्या नाहीत.

सोमवार (दि 9) रोजी संध्याकाळी आमच्या मित्राची पत्नी व मुलगा मोहननगर मधून दुचाकीवर चाललेले असताना त्यांच्यामागे तीन कुत्री (Stray dogs) लागली. ते दोघे ही जोरात रस्त्यावर खाली पडले. दोघांना जबर मार लागला. नशीबाने त्यांचे प्राण वाचले. महिलेचा हात व पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. हे केवळ पशुवैद्यकीय विभागाच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे घडले आहे. त्यामुळे संबंधित यातील दोषींवर कठोर कारवाई करून या समस्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण हे प्रकरण गांभीर्याने घेऊन योग्य त्या उपाय योजना तातडीने त्वरित राबवाव्यात. अन्यथा आम्हाला आपल्या विरुद्ध कायदेशीर व आंदोलनात्मक मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा भापकर यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.