IPL 2021: बातमी आयपीएलची: विराटचे रॉयल चॅलेंज माहीच्या संघाने आरामात चिरडले

माहीचा लाडका सर रवींद्र जडेजा ठरला विराटच्या संघाचा रॉयल कर्दनकाळ

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : IPL 2021 च्या आजच्या वानखेडे वर झालेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ला तब्बल 69 धावांनी पराभूत करुन विराट कोहलीचे रॉयल चॅलेंज फुसके ठरवले. रविवारच्या आजच्या IPL च्या डबल धमाकाच्या पहिल्या सामन्यात महेंद्र सिंग धोनीचे नेतृत्व व प्रत्येक चाल यशस्वी ठरली.

नाणेफेक  जिंकून प्रथम  फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारीत 20 षटकात तब्बल 191 धावा कुटत कोहलीच्या रॉयल संघाला 192 धावांचे चॅलेंज दिले .फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाड ने डू प्लेसी च्या साह्याने पहिल्या विकेटसाठी 9 षटकात 74 धावांची जोरदार सलामी दिली. चांगल्या लयीत वाटणारा ऋतुराज गायकवाड केवळ 33 धावा काढुन बाद झाला.

मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या डूप्लेसिने CSK च्या सर्वात यशस्वी फलंदाज सुरेश रैना सोबत जोरदार फलंदाजी करत स्वतःचे अर्धशतक करताना संघाला 111 धवांपर्यंत पोहचवले मात्र याच धावसंख्येवर जम बसलेल्या या दोन्ही फलंदाजाना हर्षल पटेलने लागोपाठ बाद करत सामन्यात अचानक रंगत निर्माण केली असे वाटले खरे पण यानंतरच सुरू झाला, माहीच्या द सर रवींद्र जडेजा शो. 

आधी अंबाती रायडू सोबत खेळताना तुफानी फलंदाजी करताना केवळ 28 चेंडूत 62 धावा कुटताना 5 उत्तुंग षटकार व 4 खणखणीत चौकार मारत आपले नाणे खणखणीतरित्या सिध्द करत 191 धावांची चांगली मजल मारून दिली. बंगलोर कडून आजही हर्षल पटेल  सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला खरा मात्र या 3 बळीसाठी त्याने आपल्या 4 षटकात 51 धावा देताना बंगलोर संघावर चेन्नई संघावर मेहर नजरच केली.

विजयासाठी 192 धवांचे लक्ष्य घेवून खेळताना RCB संघाची सुरुवात म्हणावी तशी चांगली झाली नाही कर्णधार विराट, वोशिंग्टन सुंदर आणि देवदत्त पडीकल हे बिनीचे शिलेदार अनुकर्मे 8, 7, आणि 34  धावा करून तंबूत परतले. या धक्यातून लागोपाठ 4 विजय मिळवणारा बंगलोर संघ सावरलाच नाहीं त्यातच भरवश्याच्या म्हशीला …..……..या म्हणीनुसार ग्लेन मॅक्सवेल व डीविलीयर्स सुध्दा अतिशय स्वस्तात बाद झाले आणि पुढचे काम रवींद्र जडेजा आणि या स्पर्धेतला आपला पहिला सामना खेळणारा इम्रान ताहीर या दुक्कलीने सहज सोपे करत RCB च्या रॉयल  संघाला केवळ 122 धावातच गारद केले आणी लागोपाठ 4 विजय मिळवणाऱ्या कोहलीच्या संघाची विजयी घोडदौडही रोखली.

आधी फलंदाजीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या धोनीच्या सर रवींद्र जडेजा ने क्षेत्ररक्षण व गोलंदाजीत सुद्धा अफलातून कामगिरी करताना आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. तोच या सामन्यातला अस्सल सामनावीर पदाचा हक्कदार होता म्हूणूनच त्याला घोषित करण्यात आले. आतापर्यंत या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या कोहलीच्या संघाला पराभवाचा जोर का धक्का देत चेन्नई सुपर किंग्जने आपला चौथा विजय नोंदवला.

विराट कोहलीच्या आक्रमक आणि आक्रस्ताळी नेतृत्वावर माहीचे शांत आणि संयम नेतृत्व आजही वरचढच ठरले, नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.