Wakad Crime News : ठार मारण्याची धमकी देत भंगार व्यावसायिकाला मागितली दीड लाखांची खंडणी

दोघांना अटक

एमपीसी न्यूज – दोघांनी मिळून एका भंगार व्यावसायिकाला ठार मारण्याची तसेच दुकान जाळून टाकण्याची धमकी देत दीड लाखाची खंडणी मागितली. दरम्यान आठ दिवसांपूर्वी आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून या व्यावसायिकाकडून जबरदस्तीने आठ हजार नेले होते. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना दगडू पाटील नगर, थेरगाव येथे घडली.

आरिफ सिद्धिक शेख (वय 25, रा. पडवळनगर, थेरगाव), गोविंद संतराम दुबे (वय 22, रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत महोम्मद हुसेन खान (वय 35, रा. दगडू पाटील नगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान यांचे भंगारचे दुकान आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी खान त्यांच्या दुकानात बसले असताना आरोपी दुकानात आले. आरोपींनी खान यांच्या गळ्यावर कोयता ठेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन आठ हजार रुपये नेले.

त्यानंतर बुधवारी (दि. 10) दुपारी दीड वाजता खान यांच्या दुकानात येऊन कोयता उगारून दहशत निर्माण केली. खान यांना ठार मारण्याची तसेच दुकान जाळून टाकण्याची धमकी देत दीड लाख रुपयांची खंडणी मागितली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.