Wakad Crime News : हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर वाकड पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – काळेवाडी फाटा, थेरगाव येथील एका हॉटेलवर सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर वाकड पोलिसांनी छापा मारला. यामध्ये हॉटेल मालक, चालक, सहकारी आणि ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 16 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हॉटेल मालक अमित चोहान, व्यवस्थापक सलमान इसामुद्दीन काझी (वय 30, रा. सुदर्शन नगर, चिंचवड), चिराग दिलीप वैष्णव, राघवेंद्र श्रीपाद बानावडीकर आणि त्यांचे साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई कल्पेश पाटील यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाट्याजवळ थेरगाव येथे हॉटेल व्हिक्टोरिया येथे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती रविवारी (दि. 1) रात्री अकराच्या सुमारास वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल व्हिक्टोरिया येथे छापा टाकला. पोलिसांचा छापा पडताच हॉटेलमधील ग्राहक पळून गेले.

या छाप्यात पोलिसांनी हुक्काची 15 भांडी, हुक्क्यासाठी लागणा-या वेगवेगळ्या फ्लेवरचे 10 डब्बे असा एकूण 16 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 188, 34, साथीचे रोग अधिनियम कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 33 क्ष, सह 131 आणि सिगरेट व तंबाखूजन्य उत्पादने (जाहिराती मनाई आणि व्यापार व वाणिज्य आणि वितरण नियमन) कायदा 2003 चे कलम 4, 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.