Wakad : पोलिसात तक्रार केल्यावरून टोळक्याचा घरात घुसून धुडगूस

एमपीसी न्यूज – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने घरात घुसून धुडगूस घातला. हातात तलवारी घेऊन घरात घुसलेल्या टोळक्याने घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच घरासमोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री साडेअकराच्या सुमारास पुनावळे येथे घडली.

सागर भरत बोरगे (वय 28, रा. बोरगेवाडा, पुनावळे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुधीर शिवाजी लिमकर (वय 26, रा. बौद्ध विहार जवळ, ओव्हाळ वस्ती, पुनावळे), अमित दत्तात्रय पाटोळे (वय 19, रा. शिंदे वस्ती चौक, रावेत), योगेश संजय धुमाळ (वय 25, रा. पुनावळे गावठाण), सुरज उर्फ टिंकू राकेश मिश्रा (वय 20, रा. भुजबळ चौक, पुनावळे), तुकाराम (पूर्ण नाव मिळू शकले नाही ) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांचे पुनावळे येथे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी (दि. 21) रात्री सागर दुकानात असताना आरोपी सुधीर याने त्यांना उधार सिगारेट मागितली. त्यावर सागर यांनी उधार देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. सिगारेट दिली नसल्याने चिडलेल्या सुधीरने सागर यांना शिवीगाळ केली. त्याविरोधात सागर यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर सोमवारी (दि. 22) रात्री बोरगे कुटुंबीय घरात झोपले असताना अचानक खिडकीची काच फुटल्याचा आवाज आला. सागर यांनी बाहेर डोकावून पहिले असता सुधीर त्याच्या मित्रांसह हातात तलवारी, कोयते घेऊन दरवाजावर लाथा मारत असल्याचे त्यांना दिसले. संतप्त झालेले टोळके पाहून बोरगे कुटुंबीयांनी घरातील बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेतले. सुधीरने लाथा मारून हॉलचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करीत घरातील साहित्याची तोडफोड केली.

घरातील साहित्याची तोडफोड केल्यानंतर टोळक्याने घराबाहेर पार्क केलेल्या पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली. हातातील तलवारी, कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपींनी जाताना सागर यांच्या घरातून साडेचार हजार रुपये असलेली पर्स देखील चोरून नेली. वाकड पोलिसांनी यातील सुधीर, अमित, योगेश आणि सुरज या चौघांना अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एम आर स्वामी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.